बारामतीत ग्रामपंचायत निवडणुकीनंतर दोन गटात वाद, सायंबाचीवाडी गावातील घटना; 80 ते 90 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर दोन गटात वाद झाल्याने 80 ते 90 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बारामती: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election 2023) अनेक धक्कादायक निकाल लागले. काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला. काही ठिकाणी तर दिग्गज नेत्यांना पराभवाची चव चाखावी लागली. बारामतीमधील सायंबाचीवाडीमधील (Baramati News) ग्रामपंचायत निकालानंतर दोन गट एकमेकांना भिडले. त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. या घटनेत वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर दोन गटात वाद झाल्याने 80 ते 90 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. निवडणूक निकालाच्या दिवशी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी जमाव बंदी, शस्त्रबंदीचा आदेश काढला होता. परंतु या अदेशास न जुमानता जमाव जमवून आरडाओरडा, मारामारी, दंगा करुन शांतता भंग, तसंच खाजगी गाड्यांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आलं. त्यामुळे पोलिसांनी स्वतः वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. आरोपी दुर्योधन भापकर याच्यावर सायंबाचीवाडी येथील पोलीस पाटील यांनी देखील गुन्हा नोंद केला आहे. दुर्योधन भापकर याने जाणीवपूर्वक पोलीस पाटलांना मारहाण केल्याचा पोलीस पाटलांचा आरोप आहे.
सायंबाचीवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत दुर्योधन भापकर यांच्या नेतृत्वाखालील स्वयंभू परिवर्तन पॅनेल आणि डी. पी. जगताप यांच्या नेतृत्वाखालील श्री. स्वयंभू हिराबाई माता ग्रामविकास पॅनेल यांच्यात लढत झाली. या पॅनेलचे पाच सदस्य निवडून आले आहेत. दुर्योधन भापकर यांच्या नेतृत्वाखालील श्री स्वयंभू परिवर्तन पॅनेलने दोन सदस्यांसह सरपंचपदाची जागा जिंकली. निवडणुकीनंकतर दर्शनाला गेले. समोरासमोर ते आल्यानंतर सुरुवातीला बाचाबाची आणि त्यानंतर दगडफेक झाली. दोन्ही गट एकमेकांना भिडले. त्यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ तेथे पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणली.
पहिल्यांदाच भाजपचा विजय
बारामातीतील काटेवाडीत अजित पवार विरुद्ध भाजप अशी लढाई होती. सत्तासंघर्षानंतर अजित पवारांच्या काटेवाडीत अजित पवारांचं वर्चस्व कायम राहतं का ?, याकडे सर्वाचं लक्ष होतं. अजित पवार गटाला यंदा भाजपने तगडं आव्हान दिलं होतं. त्यामुळे भाजपने दोन जागेवर विजय मिळवत काटेवाडीत शिरकाव केला आहे. महत्वाचं म्हणजे वॉर्ड क्र. 5 आणि वॉर्ड क्र. 2 मध्ये एक भाजपचा आणि एक भाजपने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार जिंकला आहे. या दोन्ही वॉर्डमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आई आशा पवार यांनी मतदान केलं होतं.