Gopichand Padalkar VIDEO : पुण्यातील अहिल्यादेवींच्या कार्यक्रमाला अजित पवारांना बोलावणार नाही : गोपीचंद पडळकर
Gopichand Padalkar : अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असले तरी त्यांना अहिल्यादेवी होळकरांच्या कार्यक्रमाला बोलावणार नाही अशी भूमिका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे.

पुणे : अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त (Ahilyabai Holkar Jayanti ) पुण्यामध्ये धनगरी नाद (Dhangari Naad Pragramme) कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः शाहांना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. मात्र या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलवणार का असा प्रश्न पडळकरांना विचारताच त्यांनी थेट नाही असं उत्तर दिलं. कार्यक्रमाला अजित पवारांना बोलवणार नाही असं थेट पडळकरांनी सांगितल्यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
अमित शाह कार्यक्रमाला येणार
गोपीचंद पडळकर म्हणाले की, "अहिल्यादेवी होळकरांची 300 वी जयंती 31 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने पुण्यात 50 हजार धनगरी ढोल वादनाचा कार्यक्रम आयोजितल करण्यात आला आहे. पुण्यातील या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शाह यांना आमंत्रण दिलं आहे. त्यांनी या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं आहे. तसेच या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देणार आहोत. तसेच चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांतदादा पाटील हेदेखील येणार आहेत."
अजित पवारांना बोलावणार नाही
हा कार्यक्रम पुण्यात होत असून जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलावणार का असा प्रश्न विचारल्यानंतर गोपीचंद पडळकर म्हणाले की, "आम्ही अजित पवारांना बोलावणार नाही. हा सरकारचा कार्यक्रम नाही, सरकारकडून आम्ही एकही रुपया घेणार नाही. त्यामुळे त्यांना बोलावणार नाही. हा धनगर समाजाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे कुणाला बोलवायचं ते समाजाने ठरवलं आहे."
काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
अहिल्याबाई होळकरांनी हिंदू धर्माचं आणि हिंदू मंदिरांचं संरक्षण केलं. त्यांच्या जयंतीचे 31 मे रोजी त्रिशताब्दी वर्ष आहे. अहिल्यादेवींचे काम हे जगभर प्रसिद्ध आहे. जगामध्ये महिला राज्यकर्त्या म्हणून त्यांच्या तोडीचं व्यक्तिमत्व इतिहासात सापडत नाही. सरकारच्या माध्यमातून त्यांच्या जयंतीचे अनेक कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी 50 हजार धनगरी ढोल वाजवण्याचं आणि विश्वविक्रम करण्याचं अहिल्याभक्तांनी ठरवलं आहे. धनगर समाजातून ज्या काही परंपरा आहेत त्या स्वतंत्र आहेत. त्याच पद्धतीने धनगरी ढोल हा धनगरांच्या भावनेचा विषय आहे. त्याचमुळे अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्ताने धनगरी ढोल वादनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम विश्वविक्रमी होणार आहे.
ही बातमी वाचा:























