Maratha Reservation : सरपंच असल्यापासून मराठा आरक्षणासाठी जीवाचं रान, पण आता... पुण्यातील इंद्रायणी नदीत उडी घेत स्वतःला संपवलं, सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहिलंय?
मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी गेल्याचं समोर येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणि मुलाला अनुकंपावर नोकरी मिळेना. या नैराश्यातून व्यंकट ढोपरे यांनी वृद्धापकाळात टोकाचे पाऊल उचलले आहे.
आळंदी, पुणे : मराठा आरक्षणासाठी आणखी एक बळी गेल्याचं(Maratha Reservation) समोर येत आहे. मराठा (Suicide) समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणि मुलाला अनुकंपावर नोकरी मिळेना. या नैराश्यातून व्यंकट ढोपरे यांनी वृद्धापकाळात टोकाचे पाऊल उचललं आहे. पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदीत त्यांचा आज मृतदेह आढळला. नऱ्हे आंबेगाव येथून काल ते दर्शनासाठी आळंदीत आले होते. सकाळी अकराच्या सुमारास ते तिथून निघाले आणि कुटुंबियांना घरातच एक चिट्टी सापडली. त्यातून त्यांनी आरक्षण मिळत नसल्याने टोकाच पाऊल उचलल्याचं स्पष्ठ झालं.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय?
त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलंय की, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, मी सरपंच असल्यापासून प्रयत्न करतो, तरी सरकार याला गांभीर्याने घेत नाही. तसेच 2012 पासून माझ्या मुलाला अनुकंपावर नोकरी दिली जात नाही. मुलाच्या आईच्या वडिलांच्या जागी त्याला नोकरी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. पण प्रशासन आम्हाला न्याय देत नाहीत. याच नैराश्यातून मी आत्महत्या करीत आहे.
ही चिठ्ठी पाहून कुटुंबियांना धक्का बसला आणि त्यांनी भोसरीत राहणाऱ्या जावयास याबाबत कळवण्यात आलं. तेव्हा आळंदीत त्यांचा शोध घेताना बंधाऱ्यालगत त्यांची पिशवी, मोबाईल, गळ्यातील माळ, चप्पल आणि ज्ञानेश्वरीमधील काही कागद आढळली. त्याच बंधाऱ्यात पोलीस आणि एनडीआरएफकडून शोध सुरू झाला. आज दुपारी तिथंच त्यांचा मृतदेह आढळला. त्यांना पोहायला येत असल्याने त्यांनी स्वतःच स्वतःचे हात बांधून इंद्रायणी नदीत उडी घेतल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. शवविच्छेदन अहवालात यात आणखी स्पष्ठता येईल.
हिंगोलीतदेखील मराठा आरक्षणासाठी बळी
मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी सुसाईड नोट लिहून हिंगोलीत तरुणाने आत्महत्या केली होती. तसेच, आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने 'मी मराठा आरक्षणासाठी जीव देत असल्याचे' सुसाईड नोट लिहून ठेवली होती. कृष्णा कल्याणकर (वय 25 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव होतं. 26 ऑक्टोबरला एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. कृष्णा कल्याणकर या पंचवीस वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या शेतात असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली होती. या युवकाकडून एक सुसाईड नोट सुद्धा पोलिसांना मिळाली होती. यामध्ये मराठा आरक्षणामुळे आत्महत्या करत असल्याचे मयत कृष्णा कल्याणकर या युवकाने लिहून ठेवले होतं.
इतर महत्वाची बातमी-
Dhangar Reservation : मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणासाठी टोकाचं पाऊल, 38 वर्षीय तरुणाने जीवन संपवलं