Tomato Farmer: आधी रडवलं अन् आता करोडपती केलं; टोमॅटोमुळे जुन्नरचा शेतकरी झाला करोडपती
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शेतकरी टोमॅटोमुळे करोडपती झाला आहे. टोमॅटोच्या जीवावर कोट्यधीश झालेल्या या शेतकऱ्याचं नाव तुकाराम गायकर आहे.
Tomato Farmer From Junnar : देशात सगळीकडेच टोमॅटोच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. टोमॅटोच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच टोमॅटोच्या उत्पादक शेतकऱ्यांना मात्र चांगलाच फायदा होताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शेतकरी टोमॅटोमुळे (Vegetable) करोडपती झाला आहे. टोमॅटोमुळे करोडपती झालेल्या या शेतकऱ्याचं नाव तुकाराम गायकर आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पाचघर गावात तुकाराम गायकर शेती करतात. पाचघर हे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं आहे. या गावाच्या आजुबाजूला मोठ्या प्रमाणात धरणं आहे. शेतीला पुरेसं पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांनी टॉमॅटोची लागवड केली होती. मात्र त्यानंतर टोमॅटोच्या किंमती घरसल्याने त्यांनी टोमॅटो फेकून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर खचून न जाता त्यांनी पुन्हा 12 एकरात टोमॅटोची लागवड केली. त्यांनी लागवडीचं धाडस केल्याचं त्यांना अखेर फळ मिळालं.
ज्या टोमॅटोने डोळ्यात पाणी आणलं होतं. त्याच टोमॅटोने आज गायकरांना करोडपती केलं आहे. 11 जून ते 18 जुलै या कालावधीत टोमॅटोच्या विक्रीतून तीन कोटी रुपये कमवले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) येथे टोमॅटोचे 18 हजार क्रेट (प्रत्येक क्रेटमध्ये 20 किलो टोमॅटो) तीन कोटी रुपयांना विकले आहेत. तुकाराम गायकर यांनी मुलगा ईश्वर आणि सून सोनालीच्या मदतीने पुन्हा टोमॅटोची शेती कऱण्याचा निर्णय घेतला होता.
मे महिन्यात टोमॅटो फेकून दिले...
मे महिन्यात मी एक एकर जमिनीवर टोमॅटोचे पीक घेतले, पण भाव खूपच कमी असल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन फेकून द्यावे लागले. प्रति क्रेट दर फक्त 50 रुपये, म्हणजे अडीच रुपये प्रति किलो असल्याने मी टोमॅटो फेकून दिले होते. 2021 मध्ये त्यांचे 15 लाख ते 16 लाख रुपयांचे नुकसान झाले होते, असं गायकर सांगतात.
यापूर्वी टोमॅटो एवढे महाग कधीच नव्हते...
मागील काही दिवसात टोमॅटोला सोन्याचा भाव आला आहे. मागील 15 वर्षांपासून मी व्यापार करत आहे. मात्र टोमॅटोच्या एवढ्या किंमती पाहिल्या नाहीत. आता टोमॅटो उत्पादकांना सोन्याचे दिवस बघायला मिळत असल्याचं नारायणगाव कृषी बाजारातील व्यापारी अक्षय सोलाट सांगतात. पाचघर, ओतूर, आंबेगव्हाण, आणि रोकडी या गावातील टोमॅटो उत्पादकांनी चांगली कमाई केली आहे.
... म्हणून टोमॅटोच्या उत्पादनात घट झाली!
दरवर्षी नारायणगाव बाजारपेठेत दररोज दीड ते दोन लाख क्रेट टोमॅटोची आवक होत असते. मात्र यात आता मोठी घसरण झाली आहे. आता रोज 30 हजार ते 35 हजार क्रेट टोमॅटोची आवक झाली आहे. दोन वर्षात शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचं नुकसानही झालं आहे. याच नुकसानाचा खर्च अजून भरुन निघाला नाही त्यामुळे टोमॅटोच्या उत्पादनात घट झाली आणि त्याचमुळे किंमतीतदेखील वाढ झाली आहे. गायकर यांच्यासोबतच जुन्नर तालुक्यातील अनेक शेतकरी लखपती झाले आहेत. नारायणगाव बाजार समितीमधील आर्थिक उलाढालीने ही 80 कोटींहून अधिकचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी धाडस करुन टोमॅटोची लागवड केली ते शेतकरी लखपती झाले आहेत.