(Source: Poll of Polls)
अॅडव्हान्स कोर्ससाठी पैसे दिले नाहीत म्हणून आत्महत्या, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीचं टोकाचं पाऊल
पिंपरी चिंचवडमध्ये एका अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या तरुणीला ऍडव्हान्स कोर्ससाठी घरातल्यांनी पैसे न दिल्याे तिने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं आहे.
पिंपरी चिंचवड : मुलांनी आपल्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती समजून घेणं, गरजेचं आहे. पण अलीकडच्या काळातील मुलांचा हट्टीपणा तर वाढलाच आहे, शिवाय यातून काहीजण अगदी टोकाची पावलं उचलत असल्याचेही समोर आले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या तरुणीला ऍडव्हान्स कोर्ससाठी तातडीनं 30 हजार उपलब्ध करून दिले नाहीत, म्हणून आई-वडिलांवर रागवत तरुणीने इमारतीवरून उडी घेत जीव दिला आहे. या घटनेने पालकवर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.
पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरात ही धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. नम्रता वसईकर असं या 24 वर्षीय तरुणीचं नाव होतं. नम्रताला आई-वडिलांनी मोठ्या मेहनतीने शिकवलं. वडिलांनी चपलांचा व्यवसाय करत मोठ्या मुलाला आणि नम्रताला शिक्षित करण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही उच्चशिक्षण दिलं. मोठ्या मुलाने मेहनतीच्या जोरावर अखेर पुण्यात नोकरी मिळवली. मुलीने अर्थात नम्रतानेही बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीचं (B. Tech.) शिक्षण पूर्ण केलं. त्यामुळे मुलांच्या भविष्यासाठी धुळ्यातून वसईकर कुटुंबाने पुणं गाठलं. पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात भाडे तत्वावर घर घेतलं. दरम्यान नम्रता पुण्यात नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात होती. यासाठी तिला ऍडव्हान्स कोर्स अवगत करायचा होता. यासाठी तिला 30 हजारांची गरज होती. तशी मागणी नम्रताने आई-वडिलांकडे केली. पण तातडीनं इतकी रक्कम करणं शक्य नव्हतं. मोठ्या मुलाचा पगार आणि वडिलांच्या व्यवसायातून इतकी मोठी रक्कम उभी करायला वेळ लागणार होता. म्हणून काही दिवसांत 30 हजार देऊ, मग तो कोर्स कर असं नम्रताला सांगण्यात आलं. पण ती भलतीच नाराज झाली होती.
इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या
नम्रताने याच नाराजीतून कोणाला काहीच न सांगता सोमवारी (20 डिसेंबर) भल्या सकाळी घर सोडलं. घरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरील एका इमारतीत ती गेली. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर जाऊन तिनं तिथून खाली उडी मारली. यात गंभीर जखमी झालेल्या नम्रताचा जागीच मृत्यू झाला. वाकड पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. नम्रताची ओळख पटविणारी एक ही वस्तू तिच्या सोबत नव्हती, मग पोलिसांनी तिची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु केले. तेंव्हा दुसरीकडे कुटुंबीयांनी नम्रताचा शोध सुरु केला. दिवसभर नम्रता न सापडल्याने कुटुंबीयांनी वाकड पोलिसांकडे धाव घेतली. तेंव्हा पोलिसांनी मृत नम्रताचा कुटुंबियांना फोटो दाखविला, त्यावेळी 'ती' नम्रताच असल्याची ओळख पटली. मग पोलिसांनी आत्महत्येचं कारण जाणून घेण्यासाठी कुटुंबियांना काही प्रश्न विचारले असता ऍडव्हान्स कोर्ससाठी तातडीनं रक्कम दिली नाही म्हणून ती नाराज होती. अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. इतक्या क्षुल्लक कारणावरून नम्रताने हे टोकाचं पाऊल उचल्याचं तपासातून समोर आलं. त्यामुळं पालकवर्गात चिंतेचं वातावरण आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- TET Exam Scam Case : टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक झालेले सुखदेव डेरे आहेत तरी कोण?
- TET परीक्षा घोटाळा प्रकरण : दुसऱ्या धाडीतही तुकाराम सुपेंच्या घरी घबाड, दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त
- ऐकावं ते नवलच! पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस भरतीत कॉपीसाठी 'मोबाईल मास्क'; पोलीस कॉन्स्टेबलला ठोकल्या बेड्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha