पिंपरीत अवघ्या पाचशे रुपयांसाठी मित्रांकडून दोघांची हत्या
पाचशे रुपयांसाठी दोन जणांची हत्याचा झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. मित्रांनीच पैशासाठी हत्या केल्याचंही पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.
पिंपरी-चिंचवड : पाचशे रुपयांसाठी दोन जणांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. मित्रांनीच पैशासाठी हत्या केल्याचंही पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
सलमान शेख आणि सोनाली उर्फ मॅक्स अशी मृतांची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी मॅक्स, सलमान आपले मित्र रवी वाल्मिकी, विशाल वाल्मिकी आणि इतर चौघांसोबत तळेगाव परिसरात पार्टीसाठी गेले होते. तिथे हे हत्याकांड घडले.
रवीने सलमानकडून पाचशे रुपये घेऊन विशालला उधार दिले होते. पाचशे रुपयांपैकी शंभर रुपये सलमानला परत मिळाले होते. सलमान रवीकडे उर्वरित चारशे रुपयांची वारंवार मागणी करत होता. तळेगावमध्ये पार्टीदरम्यान सलमानने पुन्हा चारशे रुपयांसाठी तगादा लावला. यावेळी झालेल्या वादानंतर रवी आणि विशालने सलमानची हत्या केली.
सलमान आणि मॅक्स 19 जुलैपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुंटुबीयांनी पोलिसात नोंदवली होती. काही दिवसांनी मॅक्सचा मृतदेह चिंचवड येथील केजुबाई बंधाऱ्याजवळ पाण्यात आढळला होता. त्यावेळी मॅक्सच्या कुटुंबीयांनी घातपात झाल्याची शंका व्यक्त केली होती.
मॅक्सच्या कुटुंबीयांच्या संशयावरुन पोलिसांनी रवी आणि विशालची कसून चौकशी केली. पोलिसांच्या चौकशीत रवी आणि विशालचं दारुच्या नशेत पैशावरून झालेल्या वादानंतर सलमानची हत्या केल्याचं कबूल केलं. सलमानच्या हत्येबद्दल मॅक्स बाहेर सर्वांना सांगेल, या भीतीने या दोघांनी मॅक्सचीही हत्या केली.
रवी आणि विशालने पुरावे नष्ट करण्यासाठी सलमानचा मृतदेह तळेगाव तर मॅक्सचा मृतदेह वाकड येथील पवना नदीत फेकले होते. याप्रकरणी पोलिसांनी रवी आणि विशालसह पाच जणांना अटक केली आहे.