Tanisha Bhise Case: तनिषा भिसे प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयच दोषी, तत्काळ दाखल करून न घेणे मोठी चूक; सरकारी समितीचा अहवाल आरोग्य विभागाला सादर
Tanisha Bhise Case: तनिषा भिसे प्रकरणातील चौकशी समितीच्या अहवालात दीनानाथ रुग्णालयावर ठपका; गर्भवती महिलेला उपचारासाठी तत्काळ दाखल करून न घेणे मोठी चूक झाल्याचं अहवालात म्हटलं आहे.

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये (Deenanath Mangeshkar Hospital) पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी शहरात संतापाची तीव्र लाट उसळली. दीनानाथ रुग्णालयाच्या (Deenanath Mangeshkar Hospital) अमानुष कृत्याबाबत निषेध व्यक्त केला जात आहे. सत्ताधारी, विरोधक पक्षांनी रूग्णालयाच्या (Deenanath Mangeshkar Hospital) विरोधात आंदोलने केली, अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लर फेकली. निष्पाप नवजात दोन बाळांची आई हिरावून घेतलेले दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन मृत महिलेच्या कुटुंबीयांकडून आमची नाहक बदनामी झाली, असे सांगत आहे.दरम्यान गर्भवती महिलेला उपचारासाठी तत्काळ दाखल करून न घेणे ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मोठी चूक आहे, असा ठपका सरकारने नेमलेल्या पाच सदस्यीय समितीने ठेवला आहे. (Deenanath Mangeshkar Hospital)
समिती अध्यक्षांनी प्राथमिक अहवाल आरोग्य विभागाला सादर केला असून, सविस्तर अहवाल दोन दिवसांत सादर केला जाणार असल्याची माहिती आहे. रुग्णाशी संबंधित सर्व कागदपत्रे, वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल व संबंधित सर्व बाबींचा अभ्यास समितीने केला आहे. रुग्णालयाने सुरुवातीपासूनच सर्व आरोप फेटाळून लावले होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे महिलेचा बळी गेल्याचे उघड होताच शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. यावेळी रूग्णालयांसमोर मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली.
सरकारकडून आंदोलनाची दखल
महिलेचा बळी गेल्याचे उघड होताच शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. विविध पक्ष संघटनांनी आंदोलन केली. त्याची दखल घेत राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची समिती नेमली होती.
भिसे कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
सुरुवातीपासूनच भिसे कुटुंबीयांकडून रुग्णालयावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तनिषा भिसे यांच्या नणंद प्रियांका पाटे यांनी माध्यमांसमोर वस्तुस्थिती मांडली होती. पोलिस प्रशासनालाही या सर्व गोष्टी घडल्या आहेत, तशाच सांगण्यात आल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. भिसे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांना भेटून या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली होती. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची खबरदारी घेतली जावी, त्याचबरोबर आमचा रोष फक्त एका व्यक्तीवर नाही, तर ढिसाळ व्यवस्थेवर आहे, अशा शब्दात भिसे कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही.परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हणल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही. परिणामी गर्भवती महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र महिलेचा जीव गमावला. या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे.























