Pune Bypoll election : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला; आज संध्याकाळी होणार उमेदवाराची घोषणा?
कसबा-चिंचवड मतदार संघाच्या अधिकृत उमेदवाराची नावं आज संध्याकाळपर्यंत जाहीर होतील, असं पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.
Pune Bypoll election : पुण्यात कसबा (kasba bypoll election) आणि चिंचवड (chinchwad bypoll electionपोटनिवडणुकीसाठी बैठकांचं सत्र सुरु आहे. आज भाजप- शिंदे गट आणि इतर संघटनांसोबत बैठक घेण्यात आली या बैठकीत कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठीच्या उमेदवारीसंदर्भात चर्चा झाली. कोणत्याच पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही. दोन्ही मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवाराची नावं आज संध्याकाळपर्यंत जाहीर होतील, असं पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी सांगितलं आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, "येत्या 6 तारखेला उमेदवार अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे, त्यावेळी आम्ही अर्ज दाखल करणार आहोत. मात्र अजून कोणाचेही नाव निश्चित झालेले नाही. मात्र आज रात्री उशिरा नावे जाहीर होतील. इच्छुक उमेदवारांच्या नावांची यादी तयार होत आहे. या दोन्ही जागांसाठी 6 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ ठरवली आहे. कसबा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज सकाळी 11 वाजता आणि चिंचवडच्या उमेदवाराचा अर्ज 1 वाजता भरला जाणार आहे.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी निवडणुकीच्या राजकीय प्रमुख माधुरी मिसाळ यांनी सर्व पक्षांच्या अध्यक्षांना लेखी पत्र दिलं आहे आणि त्यात पत्राद्वारे त्यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी विनंती केली आहे. त्याचबरोबर सर्व पक्षांच्या राज्याच्या आणि स्थानिक नेत्यांशी त्यांनी फोनवरुन बोलणं केलं आहे. त्यामुळे सर्व पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिसादाची वाट बघत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजपकडून इच्छुक उमेदवार
पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवर अनेकांचा डोळा आहे. त्यात भाजपचं अनेक वर्ष काम करत असलेल्या उमेदवारांचा देखील समावेश आहे. धीरज घाटे, गणेश बिडकर, हेमंत रासने हे या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र यांच्यापैकी कोणीही अजून उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती समोर आलेली नाही. आज संध्याकाळपर्यंत उमेदवार कोण असेल याचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या उमेदवारीसाठी शैलेश टिळक यांच्या नावाची घोषणा होते की अन्य कोणी या जागेचा दावेदार होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
कुणाल टिळक भाजप प्रदेश प्रवक्ता
पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मुक्ता टिळकांचे पती यांनी उमेदवारी अर्ज घेतला. त्यानंतर कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ट्विस्ट आला आहे. मुक्ता टिळकांचा मुलगा कुणाल टिळक यांची भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कसबा मतदारसंघात पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.