Buldhana Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातानं मायलेकींची ताटातूट; अवंतीसाठी आईनं पाहिलेल्या 'मेकअप आर्टिस्ट'च्या स्वप्नाचा एका रात्रीत चक्काचूर
Buldhana Bus Accident : पुण्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघालेल्या अवंती पोहनेकर या 25 वर्षीय तरुणीचा बुलढाण्याच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि तिच्या स्वप्नांचे पंख तिथेच कोलमडून पडले.
Buldhana Accident : पुण्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघालेल्या अवंती पोहनेकर या 25 वर्षीय तरुणीचा बुलढाण्याच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि तिच्या स्वप्नांचे पंख तिथेच कोलमडून पडले. तिच्या अशा अपघातात जाण्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. अवंतीचे वडील लहानपणीच गेल्याने तिच्या आईकडे जगण्यासाठी अवंती आणि तिची बहिण हेच कारण होतं. मात्र, मुलीचा मृत्यू झाल्याने माय मात्र पोरकी झाली आहे.
अपघातात अवंती पोहनेकरचा दुर्दैवी अंत
पुण्यात करिअर करण्यासाठी इंजिनीअर असलेली अवंती परिमल पोहनेकर ही 25 वर्षीय युवती पुण्याला विदर्भ ट्रॅव्हल्सने निघाली होती. मेकअप आर्टिस्ट आणि मॉडलिंगचा छंद असलेल्या अवंतीसाठी मात्र समृद्धी महामार्ग करिअर घडविणारा नाही तर बिघडविणारा ठरला आहे. घरच्यांना सिंदखेड राजा येथून अवंतीच्या मृत्यूची माहिती मिळाली पण, अवंतीचा शोध नातेवाईकांकडून अजूनही घेतला जात आहे. आपल्या अवंतीचे काय झाले? याची कल्पना आई आणि नातेवाइकांना करवत नाही आहे.
आईने पाहिलेलं स्वप्न एका रात्रीत भंगलं...
अवंती मुळची वर्ध्याची. वर्ध्यात गोपुरी परिसरात ती आणि तिची आई या दोघी राहतात. वडील बालपणीच नियतीने हिरावून घेतले. सावंगी येथे नोकरी करुन आईनं दोन मुलींना शिकवलं. अवंतीने सावंगी येथील अभियांत्रिकी महविद्यालयातून अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण करून करिअर घडविण्यासाठी पुणे गाठायचं असंच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अवंतीला मेकअप आर्टिस्ट म्हणून करिअर करायचं होतं. मात्र तिनं आणि तिच्या आईने पाहिलेलं स्वप्न एका रात्रीत भंगलं.
नियतीने साथ सोडली अन्...
या अपघातात अनेक मृत्यू झालेल्यांची ओळख अजूनही पटली नाही आहे. ही ओळख पटवणं आता सगळ्यांपुढे आव्हान आहे. त्या अवंतीचा चेहराही एका कोपऱ्यात कुठेतरी असेल. अवंती नेमकी कधी सापडणार आणि लेकीचा शेवटचा चेहरा नेमका कोणत्या अवस्थेत असेल याचा विचार करुनच आईनं हंबरडा फोडला आहे. वर्ध्यातून सगळी हिंमत एकवटून जगाची सामना करण्यासाठी आणि स्वप्नांच्या पाठलाग करण्यासाठी निघालेल्या अवंतीचा असा अंत होईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. मात्र नियतीने साथ सोडली आणि अवंतीच्या आईला लेकीचाच मृत्यू बघावा लागला.
अनेकांची स्वप्न पाण्यात...
विदर्भातून अनेक तरुण-तरुणी स्वप्न जगण्यासाठी विदर्भातील वेगवेगळ्या गावाखेड्यातून पुण्यात येतात. तब्बल 16 ते 18 तास प्रवास करुन त्यांना पुणे गाठायचं असतं. मात्र हाच प्रवास चांगला झाला तर कुठे स्वप्न पूर्ण करण्याकडे एक पाऊल पुढं सरकता येतं, नाहीतर याच प्रवासात असा घात झाला तर अनेकांची स्वप्न फक्त स्वप्नच राहतात आणि कुटुंबातील अनेकांच्या डोळ्यात कायमचं पाणी देऊन जातात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :