IND vs PAK U19 Asia Cup Final : वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
IND vs PAK U19 Asia Cup Final : अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताला पराभूत केलं आहे. पाकिस्ताननं भारताचा 191 धावांनी पराभव केला.

दुबई : आयसीसी अकॅडमी दुबई येथे सुरु असलेल्या अंडर 19 आशिया कपमध्ये पाकिस्ताननं भारताला अंतिम फेरीच्या लढतीत पराभूत केलं आहे. पाकिस्ताननं भारतावर 191 धावांनी विजय मिळवला. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 347 धावा केल्या होत्या. यामध्ये पाकिस्तानच्या समीर मिन्हासनं शतकी खेळी केली होती. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा संघ 156 धावांपर्यंत पोहोचू शकला.
फायनलमध्ये भारतासाठी वैभव सूर्यवंशीनं 10 बॉलमध्ये 26 धावा केल्या. कॅप्टन आयुष म्हात्रे फक्त 2 धावा करुन बाद झाला. भारताचे सहा फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकले नाहीत. दीपेश देवेंद्रन यानं 16 बॉलमध्ये 36 धावा केल्या. पाकिस्तानच्या अली रजानं 42 दावा देत 4 विकेट घेतल्या. याशिवाय मोहम्मद सयाम, अब्दुल सुबहान आणि हुजैफा हसान यांनी दोन-दोन विकेट घेतल्या.
भारताचे स्टार फलंदाज फ्लॉप
पाकिस्तानच्या 347 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या ओव्हरमध्ये कॅप्टन आयुष म्हात्रे केवळ 2 धावा करुन बाद झाला. त्यावेळी भारताच्या 32 धावा झाल्या होत्या. अरोन जॉर्ज 16 धावा करुन बाद झाला. यानंतर वैभव सूर्यवंशी 26 धावा करुन बाद झाला. वैभव सूर्यवंशीनं 3 षटकार आणि एक चौकार मारला.
भारताच्या टॉप ऑर्डरचा कोणताही फलंदाज मैदानवर टिकू शकला नाही. वेगात धावा बनवण्याच्या प्रयत्नात भारताच्या विकेट गेल्या. त्रिवेदनं 9 धावा, अभिज्ञान कुंडू 13 धावा, कनिष्क चौहान 9, खिलन पटेल 19 धावा करुन बाद झाला. हेनिल पटेल यानं 6 धावा केल्या. तर दीपेशन देवेंद्रन यानं 36 धावा केल्या.
समीर मिन्हासची 172 धावांची खेळी
पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 7 विकेटवर 347 धावा केल्या. पाकिस्तानचा सलामीवर 113 बॉलमध्ये 172 धावांची खेळी केली. यामध्ये त्यानं 17 चौकार आणि 9 षटकार मारले. समीर मिन्हासनं 71 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं.
भारतानं साखळी सामन्यात पाकिस्तानला 90 धावांनी पराभूत केलं होतं. भारताला पाकिस्ताननं अंतिम सामन्यात 191 धावांनी पराभूत केलं आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाचे स्टार खेळाडू अपयशी ठरल्यानं पाकिस्ताननं विजेतेपद मिळवलं. वैभव सूर्यवंशी मागील सामन्यात देखील पाकिस्तान विरुद्ध मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता.




















