Baramati : अमेठीचा कार्यक्रम केलाच आहे, आता टार्गेट बारामती; राम शिंदे यांचा पवारांना इशारा
Ram Shinde : दिवस बदलतात, पावसाळा झाला की हिवाळा येतो, आपल्याला उन्हाळा होता आता पावसाळा आला आहे असं भाजप नेते राम शिंदे म्हणाले.
पुणे : गेल्या वेळी बारामतीचा (Baramati) कार्यक्रम थोडक्यात हुकला, अमेठीचा कार्यक्रम केलाच आहे, आता टार्गेट बारामती आहे असं भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) या बारामती दौऱ्यावर येणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या इंदापुरातील आढावा बैठकीत ते बोलत होते.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या 22, 23 आणि 24 सप्टेंबरला बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या निमित्ताने भाजपने (BJP) जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासंबंधित नियोजन कार्यक्रमात बोलताना राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले की, "A म्हटलं की अमेठी आणि B म्हटलं की बारामती. A चा कार्यक्रम 2019 ला केला, 2019 ला बारामतीचा कार्यक्रम हुकला. तो आता 2024 ला करायचा आहे. त्याच्यासाठीच 17 महिने अगोदरच हे नियोजन सुरू आहे. हे नियोजन असं-तसं नसून या या ठिकाणी देशाच्या अर्थमंत्री येणार आहेत. त्या तीन दिवस बारामतीत असणार आहेत. त्यातील एक दिवस इंदापूरला मुक्कामी येणार असल्याने भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक किती गांभीर्याने घेतली आहे हे लक्षात येतं. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच आहे."
भाजप नेते राम शिंदे यांनी यावेळी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, "मागील दोन महिन्यात कोणाकोणाला नोटीस आल्या यावरून तुम्हाला कळाले असेलच की ही निवडणूक किती सीरियस लढणार आहे की नाही. काहींच्या चेहऱ्याकडे बघितले की लगेच लक्षात येते, नाव घ्यावं लागत नाही."
'मला त्रास होतो, मात्र त्याची भीती कमी झाली आहे. तुमचा त्रास कमी झाला आहे का? नसेल झाला तर आपण आपल्याकडील पान्याने टाईट करू' असं वक्तव्य राम शिंदे यांनी इंदापूरला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना उद्देशून केलं. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. दिवस बदलतात, पावसाळा झाला की हिवाळा येतो, आपल्याला उन्हाळा होता आता पावसाळा आला आहे. वातावरणात बदल होत असतो. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही असं राम शिंदे यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या :
- भाजपचं मिशन लोकसभा, महाराष्ट्रातल्या 16 मतदारसंघांमध्ये केंद्रीय मंत्र्यांचे दौरे, बारामतीची जबाबदारी अर्थमंत्र्यांकडे
- BJP Loksabha Mission 45 : लोकसभेसाठी महाराष्ट्रात भाजपचं मिशन 45 सुरु, शरद पवारांच्या बालेकिल्ल्यांवर भाजपची विशेष नजर