(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News: भारतात CNGचं उत्पादन होतं तरीही दरवाढ का?; पुण्यातील रिक्षाचालक संतापले
पुण्यातील आरटीओ कार्यालयासमोर रिक्षाचालकांनी एकत्र येत हे आंदोलन केलं आहे. मोठ्या घोषणाबाजी करत शेकडोंच्या संख्येत रिक्षाचालक जमले होते.
Pune News: CNG चे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचं मोठं नुकसान होत आहे. पुण्यात CNGचा दर 91 रुपये प्रतिकिलो झाला आहे. त्यामुळे या दरवाढी विरोधात रिक्षाचालकांनी आंदोलन केलं. पुण्यातील आरटीओ कार्यालयासमोर रिक्षाचालकांनी एकत्र येत हे आंदोलन केलं आहे. मोठ्या घोषणाबाजी करत शेकडोंच्या संख्येत रिक्षाचालक जमले होते.
91 रुपये प्रतिकिलो CNG चा दर झाल्याने रिक्षाचालक हतबल झाले आहेत. CNG वर आम्हाला अनुदान मिळालं पाहिजे. पुण्यातील 60 टक्के नागरिकांना रिक्षाचालक सेवा देतात. त्याच बरोबर पीएमपीएमएलला त्यांचा तोटा भरुन काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने 100 कोटी दिले. 40 टक्के प्रवासी सेवा देणाऱ्यांना या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. मात्र 60 टक्के नागरिकांना प्रवासी सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांवर दरवाढीमुळे उपासमारीची वेळ आली आहे, असं मत रिक्षाचालकांनी व्यक्त केलं आहे.
एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले होते तेव्हा आमच्या समस्या सुटतील अशी अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी निदान आमच्या काही मागण्या पुर्ण केल्या पाहिजे. दरवेळी मीटर वाढ करुन आम्हाला शांत बसवलं जातं. मीटर वाढ केली तर प्रवाशी आमच्यापासून दूर जातो. ओला, उबर रिक्षातून, होणारी बेकायदेशीर वाहतूक आणि लायसन्स परमिट नसणाऱ्या वर कारवाई करा ही देखील मागणी रिक्षाचालकांनी केली आहे.
भारत हा यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्याच देशातील रिक्षाचालकांना स्वत:च्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरावं लागतं. हे आमचं दुर्दैव आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दर दिवसाला 800 रुपये कमाई होते त्यात 300 रुपयांचा CNG भरावा लागतो. त्यामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत. भारतात हा CNG उत्पादन करणारा देश आहे. तरीही भारतात CNG महाग विकला जात आहे. बाहेर देशात CNG स्वस्त आणि उत्पादन करणाऱ्या देशात CNG महाग का?, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.
नागपूर शहरात सर्वाधिक महाग
नागपुरात सीएनजी पेट्रोल-डिझेलपेक्षाही महाग विकलं जात आहे. शहरात मोजकेच सीएनजीचे विक्रेते असून विदर्भातील इतर जिल्ह्यांपेक्षाही महाग सीएनजी नागपूरात विकलं जात आहे. नागपूरमध्ये CNG चा दर हा 116 रुपये प्रति किलो आहे.