Chandani Chowk : पूल पडताना पाहण्यासाठी सतरंज्या, चटया अन् खुर्च्या घेऊन या, पुणेकरांच्या भन्नाट सूचना सोशल मीडियावर व्हायरल
Pune : पुण्यातील चांदणी चौकातील पूल आज रात्री अडीच वाजता नऊ सेकंदात पाडण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी पुणेकरांनी पुणेरी शैलीत सूचना दिल्या आहेत. या सूचना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहेत.
Pune Chandani Chowk Bridge Demolition : पुण्यातील चांदणी चौकातील (Chandani Chowk) पूल आज रात्री अडीच वाजता नऊ सेकंदात पाडण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी पुणेकरांनी पुणेरी शैलीत सूचना दिल्या आहेत. या सूचना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहेत.
कोणत्या आहेत त्या सूचना एकदा वाचाच...
1) ज्या पुणेकरांना भारतीय पद्धतीने खाली मांडी घालून बसून हा इव्हेंट पाहायचा आहे, त्यांनी मुळशीकडून येणाऱ्या जुन्या बावधन चौपाटी परिसरातील टेकडीवर बसावे. प्रत्येकाने आपापल्या सतरंज्या, चटया किंवा फोल्डिंग चेअर घेऊन याव्यात. पावसाची शक्यता असल्याने आपली छत्री जवळ बाळगावी.
3) ज्यांना या निमित्ताने एक छोटेसे ओपन टू स्काय कॅम्पिंग आणि पिकनिक करायचे आहे त्यांनी मस्त सुकी भेळ आणि थरमासमध्ये गरम गरम कॉफी घेऊन यावे. पाऊस पडत असेल तर पूल पाडायचा कार्यक्रम रद्द केला जाईल. भेळ आणि कॉफी घरी जाऊन सकाळी नाष्ट्यामध्ये खावी.
3) या शिवाय परिसरातील सगळ्या नगरसेवकांनी जमलेल्या नागरिकांना मोफत मसाला दूध वाटप करायचे ठरवले आहे. त्याचा प्रत्येकी फक्त एकच ग्लास घेऊन सर्वांनी सहकुटुंब लाभ घ्यावा.
4) ज्यांना उभे राहून सोहळा बघायचा आहे त्यांनी मुळशीकडून येऊन बावधन साईडला उतरुन साताऱ्याकडे जाणाऱ्या नवीन पुलावर जमावे.
5) कोणी ही वात्रट तरुणांनी दिवाळी मधले फटाके समजून स्वतःहून ठरलेल्या वेळेआधी लाईटरने स्फोटक पेटविण्याचा प्रयत्न करु नये. असे केल्यास त्यांना भर चौकात (पूल पाडण्या आधी) पोकळ बांबूंचे फटके देण्यात येतील.
6) रात्री उशिरापर्यंत दांडिया खेळून डायरेक्ट पूल पाडण्याचा कार्यक्रम बघायला आलेल्या आमच्या गुजराती मित्र मैत्रिणींनी मोकळी जागा बघून पूल पडेस्तवर फेर धरून लगेच गरबा खेळायला सुरू करु नये. आम्ही पुणेकर फक्त ढोल ताशांच्या गजरात ताल धरतो. पुणेकरांच्या तोंडातून वेदांता प्रकल्पाचा घास पळवून नेल्याचा राग जागेवरच काढला जाईल.
7) पुणेकर हादरले, चांदणी चौकात दसऱ्या आधीच दिवाळीची आतिषबाजी, ट्रॅफिक जाम मुक्त पश्चिम पुणे घेणार मोकळा श्वास अशा शीर्षकाच्या हेडलाईन्स पूल पडायच्या आधीच रात्री 12 वाजता प्रिंटला पाठविणाऱ्या सब से तेज पत्रकारांना वारजे बाजूने वेदभवन येथून हा प्रसंग कव्हर करता येईल. स्फोटानंतर उडालेले दगड आपला वेध घेणारं नाही याची मात्र त्यांनी काळजी घ्यावी.
8) संपूर्ण एक किलोमटरच्या परिसरात नागरिकांना पूल उध्वस्त होत असतांना फेसबुक लाईव्ह आणि इन्स्टावर स्टोरी टाकण्यासाठी मोफत हाय स्पीड वाय फाय उपलब्ध करण्यात येईल.
9) पूल शेवटी पुण्याचाच आहे. त्यामुळे अतिशय शक्तिशाली स्फोटके लावूनसुद्धा पूल मोडला नाही तर त्याला प्रशासन जबाबदार राहणार नाही.
10) जर ठरवल्या प्रमाणे पूल पडलाच तर पुलाचा एक छोटा तुकडा प्रत्येक नागरिकाला एक आठवण म्हणून देण्यात येईल. त्यानिमित्ताने पडलेला राडारोडा लवकर क्लिअर करण्यासाठी मदत होईल.
11) हायवेच्या दक्षिण दिशेला (वारजे, सिंहगड रोड, कात्रज परिसरात) राहणाऱ्या लोकांनी हायवेच्या उत्तरेला मुंबईच्या दिशेनं येऊन हा सोहळा बघितला तर घरी परत जाताना युनिव्हर्सिटी सर्कलला वळसा घालून घरी जाण्याची तयारी ठेवावी.