(Source: ECI/ABP News/ABP Majha)
....म्हणून आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशांची तडकाफडकी बदली!
कृष्ण प्रकाश यांची बदली होणार अशी चर्चा अनेकदा रंगायची, अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झाला. पण कार्यकाळ संपण्यापूर्वीच कृष्ण प्रकाशांची बदली का झाली? त्याचा हा मागोवा.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडचे आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशांची तडकाफडकी बदली करण्यात आलीये. गुन्हेगारांवर वचक ठेवण्याची आणि प्रत्येक परिस्थितीला बेधडकपणे सामोरं जाण्याची त्यांची ख्याती आहे. सुरुवातीच्या काळात याची परिचिती ही आली. पण कालांतराने त्यांच्या या ख्यातीला तडा गेल्याचं पहायला मिळालं. म्हणूनच अनेकदा ते वादाच्या भोवऱ्यात अडकले. त्यामुळेच प्रसारमाध्यमांत ते या ना त्या कारणाने नेहमीच झळकत राहिले. मात्र शहरातील गुन्हेगारीला म्हणावा तसा चाप बसलाच नाही. म्हणूनच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना ही त्यांची कान उघडणी करावी लागली होती. तेव्हापासून कृष्ण प्रकाश यांची बदली होणार अशी चर्चा अनेकदा रंगायची, अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झाला आणि त्यांच्याजागी अंकुश शिंदेंची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली. पण कार्यकाळ संपण्यापूर्वीच कृष्ण प्रकाशांची बदली का झाली? त्याचा हा मागोवा.
आयर्नमॅन कृष्ण प्रकाशांनी सप्टेंबर 2020मध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदाची सूत्र हाती घेतली. तेव्हापासून ते शहरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्याला प्राधान्य द्यायचे. अलीकडेच महिला दिनी आयोजित 'वर्दी क्वीन' कार्यक्रमाला ते जातीने हजर होते. तेंव्हा आयुक्तालयातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वर्दीत रॅम्प वॉक केला होता. काही महिला कर्मचाऱ्यांची इच्छा नसताना त्यांना या फॅशन शो मध्ये सहभाग नोंदवावा लागला होता. अशी चर्चा तेव्हा दबक्या आवाजात रंगली होती. हे कमी की काय पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा रॅम्प वॉक करून त्यात भर घातली होती. त्यावेळी काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर डीपी आणि स्टेट्सला रॅम्प वॉकचे फोटो ठेवले होते. पण काहीवेळातच हे फोटो हटविण्याच्या सूचना अतिवरिष्ट अधिकाऱ्यांनी दिल्या अन् तातडीनं त्या सूचनांचं पालन झालं होतं. त्यामुळे उलट-सुलट चर्चा ही रंगली होती. तीच चर्चा गृहविभागाच्या कानापर्यंत पोहचल्याचं ही बोललं गेलं होतं. या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि एका लोकल चॅनेलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलं होतं. त्यामुळे पोलीस आयुक्त प्रकाश हे अडचणीत येतील अशी चर्चा रंगलीच होती.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश चर्चेत राहण्याला हे एकमेव कारण नव्हतं. तर पेपरफुटी प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पुणे पोलीस हिरो झाले. तेच प्रकरण आधी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशांपर्यंत पोहचलं होतं. पण त्यांनी या गंभीर प्रकरणाकडे निष्काळजीपणे पाहिलं. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उभे राहिले. त्याच काळात हत्या सत्राने पुन्हा डोकं वर काढलं. अन् गुन्हेगारांनी जणू त्यांना खुलं आव्हान दिलं. गुन्हेगारांवर वचक ठेवणारे अन प्रत्येक परिस्थितीला बेधडकपणे सामोरे जाणारे आयर्नमॅन पोलीस आयुक्तांची तेंव्हा मात्र बोलती बंद झाली होती. हे कमी होतं की काय गोळीबार प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी पोलीस आयुक्त प्रकाश स्वतः हजर राहिले. नुकतंच उन्मळेलेलं अख्ख झाड उचलून तीन आरोपींच्या दिशेने फेकले आणि मग आरोपींना जेरबंद करण्यात आलं. या झाडफेकीसाठी शक्तिमान झालेल्या कृष्ण प्रकाशांची चर्चा राज्यभर रंगली. तेव्हा ही गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी याप्रकरणावर हसत-हसत प्रतिक्रिया दिली होती. नंतर गृहमंत्र्यांनी त्यांची कानउघडणी ही केली होती. त्यावेळी ही बदलीच्या चर्चेला उत आला होता.
वेषांतर करून पोलीस स्टेशन आणि चेक पोस्टवर धाड टाकल्याने पोलीस आयुक्त प्रकाशांवर कौतुकाची थाप पडली. म्हणून पुन्हा एकदा वेषांतर करून त्यांनी एक स्टिंग ऑपरेशन केलं आणि आरोपींना बेड्या ठोकल्या. पण या दोन्ही वेशांतराचं वृत्तांकन करायला घटनास्थळी पत्रकार कसे काय पोहचले? यावरून ही पोलीस आयुक्त प्रकाशांवर प्रश्न उपस्थित केले गेले. नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत राहिलेल्या पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशांनी अवैद्य धंद्यांना मात्र चाप लावला. पण काही कारवाईमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप ही केले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच त्यांची वर्णी लावली होती. हा मुद्दा नेहमी आरोपांच्या अग्रस्थानी असायचा. पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर झालेला गोळीबार अन् गोळीबार करणाऱ्या आरोपीला झालेली अमानुष मारहाण याप्रकरणात आमदार पुत्राला ही अटक करून, पोलीस आयुक्त प्रकाशांनी धडाडीची कारवाई ही केली होती. राज्य सरकारचा दबावाला बळी न पडता त्यांनी उचलेल्या पावलाचं सर्वच स्तरातून कौतुक झालं होतं.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशांची दीड वर्ष अशा पध्दतीने चर्चेत गेली. या दरम्यान प्रसिद्धी झोतात रहायला त्यांना नेहमीच आवडायचं. मात्र यातील काही प्रकरणं भोवल्याने त्यांची तडकाफडकी बदल करण्यात आली. आता त्यांना राज्याचं व्हीआयपी सुरक्षेच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पद देण्यात आलं तर त्यांच्याजागी अंकुश शिंदे यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदी वर्णी लागली.