मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाला खडबडून जाग, भुशी डॅम परिसरातील चहा,भजी, कणीस विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले
भविष्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबियांसारखी दुर्घटना घडू नये आणि त्याला ही अतिक्रमणे जबाबदार ठरू नयेत, म्हणून प्रशासनाने तातडीनं हा निर्णय घेतलाय. लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली आहे. मात्र हा कारवाईत सातत्य राहणं गरजेचं आहे.
पुणे : लोणावळ्यात (Lonavala) दोन कुटुंब वाहून गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) कठोर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर झोपलेल्या प्रशासनाला जाग आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला 24 तास उलटायच्या आतच प्रशासनाने पर्यटनस्थळावरील अतिक्रमाण हटवायला सुरुवात केली आहे. भुशी धरण परिसरात पर्यटनाला अडसर ठरणारी छोटे हॉटेल, फेरीवाले, चना-चाट विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आलीय आहे. भविष्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबियांसारखी दुर्घटना घडू नये आणि त्याला ही अतिक्रमणे जबाबदार ठरू नयेत, म्हणून प्रशासनाने तातडीनं हा निर्णय घेतलाय. लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली आहे. मात्र हा कारवाईत सातत्य राहणं गरजेचं आहे.
लोणावळ्यातील पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या भुशी धरण परिसरातील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू झाली आहे. लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाकडून संयुक्त अतिक्रमण कारवाई सुरू आहे. भुशी धरण परिसरात चहा, नाष्टा, भजी विक्रेते, फेरीवाले, कणीस विक्रेते यांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे.
रेल्वे पोलीस दल आणि लोणावळा पोलिसांचा मोठा बंदोबस्त
लोणावळ्यातील पर्यटन स्थळ असलेलं भुशी धरण हे आज ओव्हरफ्लो झाले. पुणे आणि मुंबई यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून पर्यटक हे केवळ भुशी धरणात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मात्र या ठिकाणी अतिक्रमणामुळे मोठी गर्दी झाली आहे. दोन दिवसापूर्वी घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली. याची गंभीर दखल घेऊन कारवाईला सुरुवात केली आहे. या कारवाईवेळी रेल्वे पोलीस दल आणि लोणावळा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लोणावळ्यातील (Lonavala) धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याचअनुषंगाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) कठोर कारवाईचे आदेश दिलेत. संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आलंय.
लोणावळ्यात 24 तासात 136 मिमी पावसाची नोंद
पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असणाऱ्या पुण्यातील लोणावळ्यात दिवसभर धो धो पाऊस झाला आहे. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत 136 मिलीमीटर पाऊस बरसला आहे. यंदा 12 जूनला 106 मिलीमीटर पाऊस कोसळला होता, त्यानंतर काल पावसाने तुफान बॅटिंग केली. आत्तापर्यंत या मोसमात 798 मिमी पावसाची नोंद झालीये.
हे ही वाचा :
Pune News: भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मोठा निर्णय, पुण्यातील धबधबे पर्यटकांसाठी बंद, 30 सप्टेंबरपर्यंत नो-एन्ट्री