राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील ट्वीटरवर आमने-सामने
पंधरा वर्ष सत्तेत असलेले शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अमोल कोल्हे यांनी पराभव केला होता.
मुंबई : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी सत्तेत आहे. मात्र सत्तेत एकत्र असलेल्या पक्षाच्या नेत्यांमधील मतभेद या ना त्या कारणाने समोर येत आहेत. आता राष्ट्रवादीचे विद्यमान आणि शिवसेनेचे माजी खासदार एकमेकांवर सोशल मीडियावर टीकास्त्र सोडताना दिसत आहे. पुण्यातील शिरुर मतदारसंघांतील खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील द्वंद समोर आलं आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी एका वृत्तपत्राची बातमी ट्विटरवर शेअर करत त्या बातमीचा समाचार घेतला आहे. या बातमीत मतदारसंघातील चार आमदारांच्या दबावामुळे अमोल कोल्हे भाजपात जाणार असल्याचं म्हटलं आहे. यावर अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत म्हटलं की, '15 वर्षे मालिका क्षेत्रात काम करताना एवढा अफाट कल्पनाविस्तार आणि करमणूक कधी पाहायला मिळाली नव्हती! मन:पूर्वक आभार! मात्र अमोल कोल्हे यांनी या ट्वीटमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना टॅग करत अप्रत्यक्ष टोला लगावला. त्यामुळे आढळराव पाटलांनीही एक दुसरी बातमी ट्वीट करुन अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर दिलं.
“१५ वर्षे “ मालिका क्षेत्रात काम करताना एवढा अफाट कल्पनाविस्तार आणि करमणूक पहायला मिळाली नव्हती! मन:पूर्वक आभार!@MPShivajirao pic.twitter.com/FyR8n8AmPx
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) September 19, 2020
"ज्यांनी विनोदाची सुरुवात केली अशांवर त्यांचेच विनोद उलटल्यावर त्यांना सहनही होत नाहीत आणि त्रागाही करता येत नाही. मग सुरू होते आभाराची भाषा! करमणूक अन कल्पनाविस्तारात रमण्यापेक्षा मोठ्या विश्वासानं लोकांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडावी म्हणजे जनतेत हसं होणार नाही," असं ट्वीट आढळराव पाटलांनी केलं. त्यामुळे दोघांमधील हा शाब्दिक वाद इथेच थांबला नाही तर दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांसाठी ही डोकेदुखी ठरु शकते.
ज्यांनी विनोदाची सुरुवात केली अशांवर त्यांचेच विनोद उलटल्यावर त्यांना सहनही होत नाही अन त्रागाही करता येत नाही. मग सुरू होते आभाराची भाषा!
करमणूक अनं कल्पनाविस्तारात रमण्यापेक्षा मोठ्या विश्वासानं लोकांनी सोपविलेली जबाबदारी पार पाडावी म्हणजे जनतेत हसं होणार नाही.@kolhe_amol pic.twitter.com/TJn1UkrS6f — Shivajirao Adhalrao (@MPShivajirao) September 19, 2020
पंधरा वर्ष सत्तेत असलेले शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अमोल कोल्हे यांनी पराभव केला होता. शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांना खासदारकीसाठी तिकीट मिळालं. शिरुर मतदारसंघातील एकूण 12 लाख 86 हजार 226 मतांपैकी अमोल कोल्हे यांना 6 लाख 32 हजार 442 मते मिळाली. आढळराव पाटील यांना 5 लाख 74 हजार 164 मते मिळाली होती.