(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आळंदी बंदचा निर्णय मागे, संध्याकाळी गावकरी विठुरायाच्या पालखीचं स्वागत करणार
विश्वस्त पदासाठी वारकऱ्यांना वेठीस धरणं योग्य नाही, हे माऊलींनांही पटलं नसतं. असा सूर वारकऱ्यांमधून उमटत आहे.
पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या (Sant Dnyaneshwar Maharaj) संजीवन समाधी सोहळ्यावर आळंदी (Alandi) बंदचे सावट हटले आहे .गावकऱ्यांनी आळंदी बंदचा निर्णय घेतल्यानंतर बाजारपेठ पुन्हा गजबजली आहे. वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी गावकऱ्यांनी बंदचा निर्णय मागे घेतला. संध्याकाळी अलंकापुरीत दाखल होणाऱ्या संतांच्या पालख्यांचेही ग्रामस्थ स्वागत करणार आहेत. विश्वस्त पदासाठी वारकऱ्यांना वेठीस धरणं योग्य नाही, हे माऊलींनांही पटलं नसतं. असा सूर वारकऱ्यांमधून उमटला होता.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळ्याची आजपासून झाली. पण पहिल्याच दिवसावर आळंदी बंदचे सावट होते. आळंदी सकाळपासून ठप्प होतीच पण मंदिर परिसरातील हार-फुलांची दुकानं वारकऱ्यांच्या सोयीसाठी खुली होती. मात्र हैबतबाबांच्या पायरीचं पूजन होताच ही दुकानं ही बंद करण्यात आली. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सदैव तत्पर असणारे आळंदीकर इतके आक्रमक का झाले असावेत? असा प्रश्न पडला असेल. तर त्याला कारण ठरलं स्थानिकांना विश्वस्त पदी डावलण्यात आल्याचं. त्यामुळं ही निवडप्रक्रिया कशी होते, हे पाहणं ही महत्वाचं आहे.
निवडप्रक्रिया कशी होते?
- देवस्थानच्या विश्वस्तांची निवड ही पुणे जिल्हा सत्र न्यायाधीशांकडून होते
- 1852 साली म्हणजे ब्रिटिश काळात विश्वस्त नियुक्तीची घटना तयार झाली
- 1934 साली यात दुरुस्ती करण्यात आली
- त्यानुसार पुणे जिल्ह्यातील व्यक्तींना या पदी विश्वस्त म्हणून नियुक्त केलं जातं
- मात्र यात स्थानिक ग्रामस्थांना घेऊ नये असा कोणताही उल्लेख नाही
आळंदीकरांनी ऐन संजीवन समाधी सोहळ्यातच बंदचे हत्यार उपसले. आळंदी बंदच्याच पार्श्वभूमीवर सकाळी दहा वाजता निषेध मोर्चा काढण्यात आला. पण तोवर लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल झाले होते. या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून देवस्थानच्या विश्वस्तांनी ग्रामस्थांना चर्चेसाठी बोलावलं. चर्चेसाठी बोलवणारे विश्वस्त हे वशिला लावून आलेत, त्यामुळं आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार नसल्याचं स्थानिकांनी स्पष्ट केलं. स्थानिक ग्रामस्थांशी समेट घालून तोडगा काढण्याचे विश्वस्तांचे प्रयत्न निष्फळ ठरले. दुसरीकडे मोठी गैरसोय होत वारकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला. ज्या वारकऱ्यांमुळं आळंदीला महत्व प्राप्त झालंय. आता त्यांना फार काळ वेठीस धरणं, सोयीचं नसेल. ही बाब लक्षात आल्यावर दुपारनंतर बंद स्थगित करण्यात आला.
विश्वस्त पदी एक तरी स्थानिक असावा, ही मागणी रास्त असेल ही. पण त्यांना विश्वस्त पदी स्थान द्यायचं की नाही घ्यावं. हे घटना ठरवू शकते. पण या विश्वस्त पदासाठी ग्रामस्थांनी वारकऱ्यांना ज्या पद्धतीने वेठीस धरलं, हे माऊलींना तरी पटलं असतं का?