Sunetra Pawar: सुनेत्रा पवार राजकारणात सक्रिय होणार का? मोळीपूजन कारखान्याचे, चर्चा लोकसभेच्या
Ajit Pawar : सुनेत्रा पवार या राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
पुणे : अजित पवार (Ajit Pawar)आजारी असल्याने आणि मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) विरोध केल्याने अजित पवार पुणे जिल्ह्यातील दौड शुगरच्या (Daund Sugar Private Limited) मोळी पूजनाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर सुनेत्रा (Sunetra Pawar) पवारांच्या हस्ते मोळी पूजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे सुनेत्रा पवार राजकारणात सक्रिय होत आहेत का असा प्रश्न पुन्हा विचारला जातोय.
सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील दौंड शुगर येथे मोळी पूजनाचा कार्यक्रम पार पडला. अजित पवारांच्या अनुपस्थित अजित पवारांच्या प्रभावक्षेत्रात सुनेत्रा पवारांनी आपले काम सुरू ठेवले. सुनेत्रा पवार राजकारणात सक्रिय होतात का? आणि बारामती लोकसभा मतदारसंघात संघातून निवडणूक लढवणार का असा प्रश्न पुन्हा विचारला जात आहे.
सुनेत्रा पवार यांचा आजपर्यंतचा प्रवास
सुनेत्रा पवार या मूळच्या धाराशिवच्या पद्मसिह पाटील यांच्या भगिनी आहेत. अजित पवारांशी विवाह झाल्यानंतर सुनेत्रा पवार राजकारणात सक्रिय झाल्या, पण थेट राजकणात त्यांनी कधीही प्रवेश केला नाही. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, हायटेक टेक्स्टाईल पार्क कापड उद्योगांशी अनेक संस्था जोडल्या. त्यामुळे अनेक कुटुंबातील महिलांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळाला. ग्राम स्वच्छता, स्मार्ट व्हिलेज, पर्यावरण संतुलित गाव या माध्यमातून सक्रिय आहेत.
सुनेत्रा पवार शिक्षण क्षेत्रात सक्रिय आहेत. त्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात सिनेट सदस्य आहेत. अजित पवारांनंतर आपल्या पार्थ आणि जय या दोन मुलांना राजकारणात आणण्यासाठी त्या सक्रिय झाल्या. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण निवडणूक लढणार असा प्रश्न उपस्थित झाला आणि सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे आले.
वाढदिवसादिवशी लागले संसदेचे फ्लेक्स
सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे परिसरात फ्लेक्स लावले. त्यावर संसदेचे चित्र असलेला फ्लेक्स लावला गेला. त्यात सुनेत्रा पवार यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सुनेत्रा पवार थेट राजकारणात प्रवेश करणार का हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. या प्रश्नाला अजित पवार असतील किंवा सुनेत्रा पवार असतील, त्यांच्याकडून स्पष्ट शब्दात नकारच देण्यात येतोय. मात्र सुनेत्रा पवार यांचे सार्वजनिक कार्यक्रमात सक्रिय होणे हे म्हणजे त्या बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार का याबाबत चर्चांना जोर मिळत आहे. आज दौंड शुगरच्या गळीत हंगामाच्या मोळी पूजनाच्या शुभारंभातून पुन्हा या चर्चा सुरू झाल्या आहे.
पवार वि. पवार लढत होणार का?
बारामती लोकसभा मतदारसंघावरती गेल्या अनेक दशकात शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्याने वेगळे काही होणार का? पवार विरूद्ध पवार अशी लढत होणार का? याकडे सगळ्यांची नजर लागली आहे. अर्थात दोन्ही गटांकडून स्पष्ट संकेत देण्यात आलेले नाहीत.
राष्ट्रवादीत जरी फूट पडली असती तरी पवार कुटुंब एक आहे हे दाखवण्याचा दोन्ही गटांकडून सतत प्रयत्न कऱण्यात आला आहे. मग अजित पवारांच्या वडिलांच्या नावाने उभी असलेल्या शाळेचा कार्यक्रम आसो वा बारामतीतील विविध कार्यक्रम असो. मात्र येणाऱ्या निवडणुकीत पवार कुटुंब फुटणार का हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. सुनेत्रा पवार आपल्या दोन मुलांना बाजूला सारून राजकारणात उतरतात का हे महत्त्वाचे असणार आहे. परंतु पवार यांचा आतापर्यंतचा अनुभव पाहता राजकारण आणि कुटुंब नेहमीच वेगळे ठेवले आहे.
ही बातमी वाचा: