Mumbai Dust Control Action Plan : वायू प्रदूषण नियमाचे उल्लंघन केल्यास 20 लाखांपर्यंतचा दंड
प्रकल्पस्थळी वायू प्रदूषण नियंत्रण नियमाचे उल्लंघन केल्यास २० लाखांपर्यंतचा दंड, एमएमआरडीएचा निर्णय, कठोर कारवाई होणार वायू प्रदूषणाची गंभीर समस्या लक्षात घेता एमएमआरडीएने बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नियमावली आणि मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत असून हवेचा दर्जा खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. वायू प्रदुषणाला पायाभूत सुविधा विकास प्रकल्प आणि बांधकाम प्रकल्प कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता अखेर पायाभूत सुविधा विकास प्रकल्पस्थळावरील वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुढाकार घेतला आहे. त्यानुसार एमएमआरडीएकडून वायू प्रदूषण नियंत्रणासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या प्रकल्पस्थळी या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात आता कठोर कारवाई केली जाणार आहे. नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदाराला ५ लाखांपासून २० लाखांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे.