Aditya thackeray on Pune Ganeshotsav 2022: स्वत:ला हिन्दूत्ववादी म्हणता मग शिवरायांचा इतिहास दाखवायला विरोध का करता?; पुण्याच्या गणपती देखाव्यावरुन आदित्य ठाकरेंचा सवाल
शिंदे फडणवीसांचं तत्पुर्त असलेल्या सरकारकडून वारंवार हिन्दूत्ववादी सरकार असल्याचं भाष्य केलं जात होतं. याच सरकारमध्ये जर शिवरायांच्या प्रतापाचा इतिहास दाखवण्यासाठी विरोध होत असेल तर ही गोष्ट फार चिंताजनक आहे.
Aditya thackeray on Pune Ganeshotsav 2022: शिंदे फडणवीसांचं तत्पुर्त असलेल्या सरकारकडून वारंवार हिन्दूत्ववादी सरकार असल्याचं भाष्य केलं जात होतं. याच सरकारमध्ये जर शिवरायांच्या प्रतापाचा इतिहास दाखवण्यासाठी विरोध होत असेल तर ही गोष्ट फार चिंताजनक आहे. स्वत:ला हिन्दूत्ववादी म्हणता मग महाराजांचा इतिहास दाखवायला विरोध का करता?, असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात एका गणपती मंडळाने अफझल खानाचा वध हा देखावा साकारण्यासाठी पुणे पोलिसांकडे परवानगी मागितली होती मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार असल्याने पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. या नकाराचे पडसाद सर्व महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत.
पुणे पोलिसांनी शिवरायांच्या जिवंत देखाव्याची परवानगी नकाराली. त्यानंतर पुण्यातील गणेश मंडळाने नाराजी व्यक्त केली होती. या मुद्यावरुन आता वाद पेटण्याची शक्यता आहे. राज्यभरातून यासंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे-फडणवीस सरकार हे शिवाजी महाराजांच्या तत्वावर चालणारं सरकार आहे. त्यांचा विचार पुढे नेणारं सरकार आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत नक्की चर्चा करुन मार्ग काढला जाईल मात्र विरोधकांनी यावरुन राजकारण करु नये, असं मत भाजप नेते प्रवीण दरेकरांनी व्यक्त केलं आहे.
देखावा हा समाजप्रबोधन करण्यासाठी असतो. आम्ही दरवर्षी अनेक वेगवेगळे देखावे साकारतो. यंदा 'अफझल खान वध' हा ऐतिहासिक जिवंत देखावा साकारण्याचा निर्णय घेतला होता मात्र पोलिसांनी या देखाव्यासाठी लागणारी परवानगी नाकारली. ही खरी घटना आहे. आपला इतिहास अनेकांना कळायला हवा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित जो काही इतिहास आहे तो दाखवण्यास काय भीती आहे? भारतात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्याची भीती वाटत असेल तर पाकिस्तानात दाखवायचा का?, असा संतप्त प्रश्न संगम तरुण मंडळाचे अध्यक्ष आणि मनसेचे नेते किशोर शिंदे यांनी उपस्थित केला होता.
देखाव्या वरुन कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार असेल तर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पुण्यात दोन वर्षांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने होणार असल्याने मंडळाचे कार्यकर्ते उत्साहात होते मात्र पोलिसांकडून काही निर्णय नाकारण्यात आल्याने मंडळांमध्ये नाराजीचा सुर बघायला मिळतो आहे.