Shiv Jayanti 2022: शिवज्योत आणण्यासाठी रायगडला निघालेल्या शिवभक्तांचा अपघात, 200 फुट दरीत कोसळली बाईक
शिवज्योत आणण्यासाठी मोटर सायकलवर ट्रिपल सिट येणाऱ्या शिवभक्तांच्या मोटरसायकलला आज पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास वरंध घाटात कावळे किल्ल्या जवळ अपघात झाला.
Shiv Jayanti 2022 : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती ( Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022) यानिमित्त महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केलं जात आहे. अशातच एक बातमी समोर येतेय. भोर येथुन रायगडकडे शिवज्योत आणण्यासाठी मोटर सायकलवर ट्रिपल सिट येणाऱ्या शिवभक्तांच्या मोटरसायकलला अपघात झाला. त्यांची मोटरसायकल सुमारे 200 फुट दरीत कोसळल्याचे समजते.
शिवज्योत आणण्यासाठी रायगडला निघालेल्या शिवभक्तांचा अपघात
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी शिवरायांना वंदन केलं जात आहे. अशातच आज पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास भोर येथुन रायगडकडे शिवज्योत आणण्यासाठी मोटर सायकलवर ट्रिपल सिट येणाऱ्या शिवभक्तांच्या मोटरसायकलला वरंध घाटात कावळे किल्ल्याजवळ अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी, मोटरसायकल सुमारे 200 फुट दरीत कोसळल्याचे समजते. या अपघातामध्ये तीन तरुण जखमी झाले आहेत. जखमींची नाव केतन देसाई (वय 23), प्रथमेश गरुड (वय 25) आणि किरण सुर्यवंशी (वय 20) भोंगवली तालुका येथे सर्व राहणारे आहेत. त्यापैकी दोघांवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एकाला प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. महाड औद्योगिक वसाहत पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य करीत जखमींचे प्राण वाचवले.
शिवजयंतीसाठी काय आहे नियमावली?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल. आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही शासनाकडून करण्यात आलं आहे. शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली होती. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Shiv Jayanti 2022 : शिवजयंतीनिमित्त शिवरायांवर आधारित 'हे' सिनेमे पाहायलाच हवे