(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Ganeshotsav 2022: पुण्यातील गणपती मंडळांसाठी महत्वाची बातमी; 'या' गावांना गणपती मंडळांसाठी पालिकेची परवानगी घ्यावी लागणार
पुणे महानगरपालिकेत (पीएमसी) नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांमधील गणेशोत्सव मंडळांची महापालिकेकडे नोंदणी झालेली नाही. त्यामुळे यंदा या मंडळांना महापालिकेकडे अर्ज करून परवाना घ्यावा लागणार आहे.
Pune Ganeshotsav 2022: पुणे महानगरपालिकेत (पीएमसी) नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांमधील गणेशोत्सव मंडळांची महापालिकेकडे नोंदणी झालेली नाही. त्यामुळे यंदा या मंडळांना महापालिकेकडे अर्ज करून परवाना घ्यावा लागणार आहे. हा परवाना 2027 पर्यंत कायम राहणार आहे. परवाना देण्याची प्रक्रिया निश्चित करून क्षेत्रीय कार्यालयांना पाठवण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत पुढील पाच वर्षांसाठी मंडळांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पत्र दिले असून पोलिस आयुक्तांनी सर्व स्थानिक पोलिस ठाण्यांना संबंधित परवाने देण्याचे आदेश द्यावे, असं सांगण्यात आलं आहे. 2019 मध्ये महापालिकेने मंडळांना परवाने दिले आहेत. या परवान्यांचा 2022 ते 2027 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी विचार केला जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
पुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीतील मंडळांनी यापूर्वी वाहतूक पोलिस आणि संबंधित पोलिस ठाण्याचे ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन मंडळ उभारण्यासाठी महापालिकेकडून परवाना घेतला आहे. मात्र नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या मंडळांची महापालिकेकडे नोंदणीच नाही, त्यामुळे येथील मंडळांनी यंदा नोंदणी करून परवाना घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे महापालिकेने 2020 आणि 2021 मध्ये 2019 चा परवाना कायम ठेवला असून दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परवाना द्यायचा असेल तर महापालिका, पोलिस आणि मंडळांना मोठी यंत्रणा नेमून काम करावे लागेल. त्यामुळे पाच वर्षांसाठी परवान्याची मागणी करण्यात आली होती.
एकनाथ शिंदे यांनी पुण्यात झालेल्या आढावा बैठकीत पंचवार्षिक परवान्याचे आदेश दिले. मात्र गणेशोत्सवाच्या तयारीसाठी महापालिकेने बोलावलेल्या बैठकीत महापालिका आणि पोलिसांमध्ये समन्वय नसल्याचे मंडळांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पालिका आयुक्तांनी पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून मंडप आणि रनिंग मांडपासाठी पाच वर्षांचा परवाना देण्यास सांगितले.