Pune News : अबब! 200 किलोचा केक! प्राची देब यांच्या रॉयल आयसिंग केकची तिसऱ्यांदा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, मोडला स्वत:चाच विक्रम
200 Kg Icing Cake : 100 किलोचा मिलान कॅथेड्रील रचना साकारणाऱ्या प्राची धबल देब यांनी यंदा 200 किलोची वेगन रॉयल आयसिंगद्वारे भारतीय राजवाड्याची रचना साकारत स्वतः चाच विक्रम मोडला आहे.
Prachi Deb Iceing Cake : पुण्यातच नाही तर जगात केकचे (Royal Iceing Cake) शौकिन अनेक लोक आहे. वेगवेगळ्या आकाराचे, प्लेवर्सचे आणि रंगाचे केक आपण पाहिलेच मात्र राजवाडा आणि मोठ-मोठ्या महलांचा केक आपण पाहिला नसेल. शामियाना ते राजवाडा, बनारसी साज शृंगार रॉयल आयसिंगपासून अशा विविध प्रकारच्या रचना साकारणाऱ्या पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या रॉयल आयसिंग केक कलाकार प्राची धबल देब यांनी नुकतेच एक नवीन जागतिक विक्रम रचला आहे. यापूर्वी तब्बल 100 किलोचा मिलान कॅथेड्रील रचना साकारणाऱ्या प्राची धबल देब यांनी यंदा 200 किलोची वेगन रॉयल आयसिंगद्वारे भारतीय राजवाड्याची रचना साकारत स्वतः चाच विक्रम मोडला आहे. नुकतीच त्यांच्या या विक्रमाची नोंद लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसने नोंदविली आहे.
मध्य प्रदेशातील रीवा येथे जन्मलेल्या प्राची या सध्या पिंपरी चिंचवड येथील रहाटणी परिसरात राहतात. त्यांनी आपले शालेय शिक्षण उत्तराखंड येथील डेहराडून येथे पूर्ण केले. त्यांनी कोलकाता येथून महाविद्यालयीन पदवी शिक्षण घेतले. त्यांचे पती हे मूळचे पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून आयटी क्षेत्रातील कर्मचारी आहेत.
बाहेर देशात घेतलं केकचं शिक्षण...
प्राची यांनी रॉयल आयसिंग या किचकट कलेचे शिक्षण युनायटेड किंगडममध्ये जगप्रसिद्ध केक आयकॉन सर एडी स्पेन्स एमबीई यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले. सामान्यतः पारंपारिक पाककलेत रॉयल आयसिंग'साठी अंड्याचा वापर केला जातो. परंतु भारतीय बाजारपेठ लक्षात घेत, प्राची यांनी अंड्याचा वापर न करता, पूर्णत: शाकाहारी उत्पादन "विगन रॉयल आयसिंग" विकसित केले. विगन रॉयल आयसिंग केक या प्रकारात त्यांनी अनेक उत्तम आणि वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती साकारल्या आहेत. त्यांच्या कलात्मकतेसाठी त्यांना "क्वीन ऑफ रॉयल आयसिंग" असे संबोधले जाते. तसेच लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसने आतापर्यंत तीन वेळा त्यांच्या विक्रमांची नोंद घेतली आहे.
लहान केकपासून सुरुवात ते थेट 200 किलोचा केक...
केवळ 3-इंच उंच शामियानापासून सुरुवात करत, प्राची यांनी अनेक कलाकृती साकारल्या आहेत. नुकतेच त्यांनी केकच्या माध्यमातून भारतीय रचना शास्त्रावर आधारित एक भव्य राजवाडयाची रचना केली आहे. ही कलाकृती तब्बल 10 फूट लांब, 4.7 फूट उंच आणि 200 किलो वजनाची आहे.
माझा रेकॉर्ड मीच मोडला...
याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की, आपल्याकडील भव्य राजवाड्यांचे वैशिष्ट्य, त्यांचे वैभव साकारण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून केला आहे. सामन्यत: रॉयल आयसिंगचा वापर केवळ नाजूक पाइपिंग आणि लेसी आयसिंग डिझाइनसाठी केला जात असताना, मी गेली अनेक वर्षे या रॉयल आयसिंगद्वारे भव्य आणि मजबूत रचना साकारत आहे. नवीन संकल्पना मांडण्यासाठी आणि माझा मागील विक्रम मोडून काढण्यासाठी मी नेहमीच वेगवेगळ्या पद्धती, माध्यम, रचना आणि तंत्रांचा वापर करत असते, असंही त्यांनी सांगितलं आहे.