(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PCMC News : हेल्मेट नसल्यानं गेला जीव! पिंपरी-चिंचवडमध्ये अपघातात 10 महिन्यात तब्बल 157 जणांचा मृत्यू
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या 10 महिन्यांत हेल्मेटशिवाय दुचाकी चालवताना झालेल्या अपघातात 157 जणांचा मृत्यू झाला आहे.
PCMC News : पिंपरी-चिंचवड (Pcmc) शहरात गेल्या 10 महिन्यांत हेल्मेटशिवाय (Helmet) दुचाकी चालवताना झालेल्या अपघातात 157 जणांचा मृत्यू झाला आहे. हेल्मेट वापराबाबत वाहतूक कर्मचारी आणि संस्था वारंवार जनजागृती करतात. मात्र या जगजागृतीचा काहीही उपयोग पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांवर होत नसल्याचं या आकड्यांमधून समोर आलं आहे.
कायद्यानुसार दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणं प्रत्येक बंधनकारक आहे. मागील 10 महिन्यांत हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या 381 जणांचे अपघात झाले आणि या अपघातात 157 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे जीव वाचवायचा असेल तर हेल्मेटसक्तीचं पिंपरीकरांना मनावर घेण्याची गरज आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दुचाकी चालवणाऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे. महाविद्यालयीन तरुण रस्त्यांवरुन सुसाट वेगाने वाहनं चालवतात. रात्रीबेरात्री सगळ्या तरुणांची स्टंटबाजी सुरु असते. या तरुणांना पोलिसांनी अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर दंडही ठोठावण्यात आला आहे मात्र हे स्टंटबाज अजूनही ताळ्यावर आल्याचं चित्र दिसत नाही. यांच्या स्टंटमुळे त्यांचा आणि इतरांचाही जीव धोक्यात असतो. त्यामुळे खास तरुणांना हेल्मेट घालण्याचं आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येतं. मात्र तरुण या आवाहनाला जुमानत नसल्याचं चित्र आहे. आतापर्यंत पिंपरी-चिंचवडच्या वाहतूक पोलिसांनी हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या 32,075 जणांकडून 1 कोटी 60 लाख रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.
अनेक दुचाकी चालवणारे हेल्मेट वापरत नाहीत कारण त्यांना हेल्मेट ओझं वाटतं. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दहा महिन्यांत हेल्मेटशिवाय दुचाकी चालवताना झालेल्या अपघातात 157 जणांचा मृत्यू झाला आहे. गंभीर बाब म्हणजे पिंपरी-चिंचवड शहरात केवळ पाच टक्के लोक हेल्मेट वापरतात तर 95 टक्के दुचाकीचालक हेल्मेट वापरत नसल्याची माहिती आहे.
बुलेटराजांवर कारवाई, हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई कधी?
सायलेन्सरमधून फटाक्याचे आवाज काढत बेफाम होऊन चालवणाऱ्या बुलेट राजांना महाग पडणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अशा बुलेट राजांवर आता थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सहा महिन्यात वीस हजार बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई झाली होती. वीस लाखांचा दंडही त्यांच्याकडून वसूल करण्यात आला होता. मात्र तरीही बुलेट राजांमध्ये सुधारणा होईना, म्हणून थेट गुन्हे दाखल करण्याची मोहीम वाहतूक पोलिसांनी हाती घेतली होती. वाहन जप्ती आणि लायसेन्स रद्द करण्याच्या दृष्टीनेही पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस पावलं उचलले होते. मात्र त्यांच्याप्रमाणेच हेल्मेट वापरत नसणाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.