Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Haribhau Bagde: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हरिभाऊ बागडे हे राज्यपालांनंतर राष्ट्रपतीपदासाठी त्यांचा विचार व्हावा अशी भावना यावेळी अतुल सावे यांनी व्यक्त केली आहे.
पुणे: आज भाजप नेते आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. त्यावेळी भाजप नेते अतुल सावे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हरिभाऊ बागडे हे राज्यपालांनंतर राष्ट्रपतीपदासाठी त्यांचा विचार व्हावा अशी भावना यावेळी अतुल सावे यांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमावेळी बोलताना सावे म्हणाले, हरिभाऊ बागडे यांनी आपल्या सख्ख्या जावयाला देखील नोटीस पाठवली होती. आम्ही रोज सोबत जेवायचो, पण आमची लक्षवेधी लावा अशी विनंती केल्यावर देखील हरिभाऊ बागडे म्हणायचे जेव्हा नंबर येईल तेव्हा लक्षवेधी, त्यामुळे त्यांनी कायम कामावर आणि त्यांच्या कर्तव्यावर ठाम राहिले. नितीन गडकरी यांना काही जणांची विनंती आहे की, हरिभाऊ बागडे यांचा विचार राज्यपालनंतर राष्ट्रपतीसाठी व्हावा, असंही त्यांनी म्हटलं आहे.
राजस्थानचे नवनियुक्त राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्याविषयी
17 ऑगस्ट 1945 रोजी महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे जन्मलेल्या हरिभाऊ किसनराव बागडे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले आहे. हरिभाऊ बागडेंनी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मध्ये प्रवेश केला. हरिभाऊंचे बालपण गरिबीत गेले. त्यांचे वडील शेतकरी होते. आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे फुलंब्रीत वर्तमानपत्रे विकली. शेतकरी कुटुंबातील हरिभाऊंना शेतीची खूपच आवड आहे.
हरिभाऊ बागडे यांनी लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केलंय. 1985 मध्ये ते पहिल्यांदा औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर, फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून ते 5 वेळा आमदार राहिले आहेत. मतदारसंघात त्यांची ओळख हरिभाऊ नाना म्हणून प्रसिद्ध आहे.
हरिभाऊ किसनराव बागडे हे महाराष्ट्र सरकारमध्ये माजी कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. 2014 मध्ये, जेव्हा भाजपाने महाराष्ट्रात पहिल्यांदा सरकार स्थापन केले, तेव्हा त्यांना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्त करण्यात आली होती. विधानसभा अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली आहे. त्यामुळेच, भाजपकडून त्यांना राज्यपालपदी संधी देऊन त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान केला आहे. दरम्यान, हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे 45 वे राज्यपाल बनले आहेत.