NCP Beed karyakarini: राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील 45 पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात; अजित पवारांनी अख्खी कार्यकारिणीच बरखास्त केली
Beed news: वाल्मिक कराड याच्यावर मकोका लागल्यानंतर बीडमध्ये राजकीय घडामोडींना वेग. अजित पवारांचा मोठा निर्णय, बीडमधील 45 पदाधिकाऱ्यांची चौकशी
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळे सातत्याने आरोप होत आहेत. किंबहुना काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याच देखील पाहायला मिळालं आणि यामुळेच आता जिल्ह्याची कार्यकारणीच बरखास्त करण्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार बुधवारी मुंबईत असणाऱ्या पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आले आणि याच ठिकाणी त्यांनी तातडीने बीड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख राजेश्वर चव्हाण यांना देखील बोलावलं. त्यानंतर काही महत्त्वाचे निर्णय अजित पवारांना घेतल्याचे पाहायला मिळाले.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 40 ते 45 पदाधिकाऱ्यांना पोलीस यंत्रणांकडून चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचे चित्र काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राने पाहिलं. या चौकशीच्या माध्यमातून तपास यंत्रणांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची बाब देखील समोर आली. आणि त्यानंतर पक्षाच्या जिल्ह्याच्या कार्यकारणीवर जोरदार टीका देखील होयला सुरुवात झाली. चौकशीच्या निमित्ताने खुद्द पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देखील पोलिसांनी चौकशीला बोलावलं होते.
अजित पवारांनी बीडची कार्यकारिणी 'या' कारणामुळे बरखास्त केली
संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये अटकेत असलेला आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्ष आहे. विष्णू चाटे याचा थेट संबंध वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याशी असल्याची देखील जिल्ह्यामध्ये चर्चा आहे आणि त्यामुळेच विष्णू चाटे सह जिल्हाध्यक्ष आणि पक्षाचे विविध पदाधिकारी यांना देखील पोलिसांनी चौकशीला बोलावलं होतं. माध्यमांमधून पक्षाची पदाधिकारी चौकशीला जात असल्याची सातत्याने येणारी बाब पाहता पक्ष सातत्याने टीका होत असल्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी कार्यकारणीच बरखास्त करण्याचा थेट निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बुधवारी बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात बोलावलं आणि जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त करण्याचे आदेश दिले यासोबतच यापुढे पक्षाचा कोणताही पदाधिकारी नेमायचा असेल तर त्याची चारित्र्य पडताळणी झाल्याशिवाय नेमणूक करायची नाही, असे स्पष्ट आदेश दिले.
अजित पवारांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष हे पद सोडून बाकी सर्वांची कार्यकारणी बरखास्त करा असं सांगितले. यासोबतच पक्षाचे 18 आणि 19 तारखेला शिर्डी येथील अधिवेशन पार पडल्यानंतर नव्याने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त करा, असेही आदेश राजेश्वर चव्हाण यांना दिले आहेत. मुळात राजेश्वर चव्हाण या संपूर्ण घटनेनंतर पदावर राहतील का? हे देखील शंका राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
अजितदादा धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेणार का?
अजित पवारांनी आक्रमक पवित्रा घेत बीडची कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तातडीने बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे प्रमुख धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. धनंजय मुंडे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची कार्यकारणी बरखास्त झाल्यामुळे धनंजय मुंडेंसाठी हा एक धक्का आहे अशी ही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सध्या धनंजय मुंडेंची एकीकडे पद वाचवणे आणि दुसरीकडे जिल्ह्यासह राज्यातील प्रतिष्ठा वाचवणं हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे
बीड जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त करताना कुठेतरी अजित पवारांनी पक्षावर सातत्याने होणारी टीका जरी थांबवली असली तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नसल्यामुळे अजूनही त्यांच्यावर राज्यभरातून दबाव निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या धनंजय मुंडे बीड जिल्ह्याची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने परळीला रवाना झाले आहेत. सध्या जी जिल्ह्यात परिस्थिती आहे ही अशीच कायम राहिली तर नक्कीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय पक्षासमोर गत्यंतर उरणार नाही, हेच या निमित्ताने स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा
‘मराठा, मराठा काय करतो, मीही 96 कुळी मराठा…’, वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं