Vinod Patil On Manoj Jarange Patil: जीआरचा टाचणी एवढाही फायदा नाही, नवीन काहीच नाही; विनोद पाटील यांनी सगळं सांगितलं
Vinod Patil On Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढे येऊन या जीआरचा अर्थ समजून सांगितला पाहिजे, असंही विनोद पाटील म्हणाले.

Vinod Patil On Manoj Jarange Patil: सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना दिलेल्या जीआरचा टाचणी एवढाही फायदा आणि उपयोग होणार नसून समाजाला यातून काहीही नवीन मिळालं नाही, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिलीय. मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढे येऊन या जीआरचा अर्थ समजून सांगितला पाहिजे, असंही विनोद पाटील म्हणाले.
मागच्या वेळेस गुलाल एकनाथ शिंदे यांनी खेळला, याचे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं नाही. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुलाल खेळला याचे उत्तर त्यांनी द्यावे, असं आव्हान देखील विनोद पाटील यांनी केल आहे. तसेच 100 पैकी या जीआरला मी मायनस झिरो मार्क्स देईल, असंही विनोद पाटील म्हणाले.
छाती ठोकपणे सांगतो, एकाचही सर्टिफिकेट निघणार नाही- विनोद पाटील
समाज माझ्याकडे अपेक्षेनने बघतो. मी न्यायालयीन लढाई लढलो. छाती ठोकपणे सांगतो यातून एकाचही सर्टिफिकेट निघणार नाही. मागणारे मागत असतात मात्र समितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी पुढे आलं पाहिजे आणि त्यांनी मला जीआरचा अर्थ समजून सांगितला पाहिजे. आज हा जो कागद दिलाय याची जबाबदारी विखे पाटील यांनी घ्यावी आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्टता द्यावी, असंही विनोद पाटील म्हणाले. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांना मी श्रद्धांजली देऊ शकलो नाही, याची आम्हाला खंत वाटते, असंही विनोद पाटील यांनी सांगितले.
मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य?
मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 5 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची लढाई सुरू केली होती. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी करत हैदराबाद आणि सातारा गॅझेटचीही मागणी केली होती. यासह, मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची आणि आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व नोकरी देण्याची मागणी केली होती. राज्य शासनाच्यावतीने काल (2 सप्टेंबर) मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर सदस्यांनी आझाद मैदानात जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. तसेच, सरकारने आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी मागितला आहे. तर इतर मागण्याचे शासन निर्णय जारी केले आहेत. त्यानुसार, अखेर शासनाने हैदराबाद गॅझेट आणि इतर मागण्याचे शासन निर्णय जारी केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले. मुंबईतील आझाद मैदानात मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष केला, गुलालाची उधळण करुन आनंदोत्सव साजरा केल्याचं पाहायला मिळालं.
























