आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र; 2025 साठी सूचवला नवा संकल्प; म्हणाले, पक्ष खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत
आपण या बालिश राजकीय स्पर्धेला बाजूला ठेवून, सर्व राजकीय पक्षांनी बेकायदेशीर पोस्टर, बॅनर आणि होर्डिंग्ज न लावण्याचा निर्णय घेतला, तर नागरिकांना आपण मोठा दिलासा देऊ शकतो
मुंबई : निवडणुका असो किंवा नसो राजकीय नेत्यांचे बॅनर्स गावागावात, चौकाचौकात आणि गल्लोगल्ली झळकल्याचे पाहायला मिळतात. दिवाळी, दसरा असो, नवरात्री असो, दहीहंडी असो किंवा नवीन वर्षाचं स्वागत असो. आपल्या नेत्याच्या डिजिटल बॅनर्ससह आपलेही फोटो झळकवण्याची जणू राजकीय पक्षाच्या समर्थकांमध्ये स्पर्धाच चाललेली असते. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात जागेची अडचण निर्माण करत अनेकदा वाहतुकीला अडथळाही निर्माण होतो. मोठ्या शहरांतील महाकाय बॅनर पडल्याने तर दुर्घटना घडून काही जणांना आपला जीवही गमावावा लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी 2025 साठी नवा संकल्प केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे पत्राद्वारे मागणीही केली आहे. राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध लावण्यात यावा, राज्यभरात हा निर्णय लागू करावा, अशी मागणीच त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
आपण 2025 मध्ये पदार्पण करताना तसेच, लोकसेवेचा संकल्प करताना, पक्षीय भेदभाव आणि विचारसरणी बाजूला ठेवून; नागरिकांना दिलासा देण्यासाठी राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध घालून आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेऊ शकता. गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या राजकीय गोंधळामुळे, प्रत्येक शहराच्या कानाकोपऱ्यात हजारो राजकीय पोस्टर (कायदेशीर आणि बेकायदेशीर) पाहायला मिळत आहेत. एक नागरिक म्हणून हे पाहून खेद वाटतो आणि एक व्यक्ती म्हणून शहर विद्रुप करणाऱ्या अशा पोस्टर्सचा त्रास होतो. गेल्या दोन वर्षांत बीएमसीकडून निवडक पोस्टर हटवण्यात आली, तर सत्ताधारी पक्षाचे पोस्टर मात्र तसेच दिसत आहेत.
आपण या बालिश राजकीय स्पर्धेला बाजूला ठेवून, सर्व राजकीय पक्षांनी बेकायदेशीर पोस्टर, बॅनर आणि होर्डिंग्ज न लावण्याचा निर्णय घेतला, तर नागरिकांना आपण मोठा दिलासा देऊ शकतो. ह्यामुळे आपली शहरे स्वच्छ दिसतीलच, शिवाय आपल्या कार्यकर्त्यांनाही अशा खर्चातून दिलासा मिळेल, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आपल्या शहरांमध्ये राजकीय होर्डिंग लावण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यास मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ह्यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 24, 2024
फडणवीस जी ह्यांनी 'नो बॅनर' उपक्रमासाठी पाऊल उचलले, तर आम्ही देखील त्यांना साथ देऊ आणि त्याचे… pic.twitter.com/oU8vKZdgmM
माझा पक्ष खांद्याला खांदा लावून आपल्यासोबत
जगात कुठेही असे राजकीय पोस्टर लावले जात नाहीत. त्यामुळे, मी आपल्याला विनंती करतो की आपण ह्यादिशेने पहिले पाऊल टाका, आम्हीही तुमच्या पाठीशी आहोत. आपण सत्तेत मुख्यमंत्री आणि आम्ही, विरोधी पक्ष म्हणून असलो तरी ह्या गोष्टींवर आपण एकत्र काम केलेच पाहिजे. आपण ह्या विषयी बैठक बोलावली किंवा सर्व पक्षांना पत्र लिहिले, तर मी, माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील, असेही आदित्य यांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून पत्रात म्हटले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आता आदित्य ठाकरेंच्या पत्राची दखल घेऊन निर्णय घेतात का हे पाहवा लागेल.
हेही वाचा
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला