महाविकास आघाडीत विदर्भातील जागांवर नेमका तिढा काय आहे? नेमकं कुठे बिनसतंय?
Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीत विदर्भातील जागावाटपावरून वाद चालू आहे. हा वाद नेमका काय आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadhi) जागावाटपावरून सध्या वाच चालू आहे. मविआतील तिन्ही पक्षांचे बहुसंख्य जागांवरून एकमत झाले आहे. मात्र विदर्भातील काही जागांचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. विदर्भात ठाकरे यांच्या शिवसेनेला अधिक जागा हव्या आहेत. तर या भागात आमचे प्राबल्य अधिक असून आम्हीच या भागात अधिक जागांवर निवडणूक लढवणार आहोत, असे काँग्रेसचे (Congress) मत आहे. दरम्यान विदर्भातील जागांच्या मुद्द्यावर मविआत सध्या तणावाची स्थिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील, असे सूचक वक्तव्य केले आहे. याच पार्श्वभूमीवर मविआत नेमकं काय चालंय? नेमका तिढा काय आहे? हे जाणून घेऊ या...
मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे असलेल्या रामटेक आणि अमरावती या जागा काँग्रेसला दिल्या होत्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्हाला विदर्भात अधिक जागा हव्यात अशी ठाकरेंच्या पक्षाची भूमिका आहे.
विदर्भातील एकूण 12 जागांवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा सांगितला आहे. या 12 जागांवर महाविकास आघाडीचा आमदार नाही. मविआचा आमदार नसलेल्याच 12 जागा आम्ही मागितल्या आहेत, असे ठाकरेंच्या शिवसेनेचे मत आहे. तर काँग्रेस हा पक्ष शिवसेनेला 12 जागा देण्याच्या मन:स्थितीत नाही. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस शिवसेनेला 8 जागा देण्यासाठी तयार आहे.
कोणत्या जागा शिवसेनेला हव्यात? कोणत्या जागांसाठी वाद?
1. आरमोरी विधानसभा - भाजपचे कृष्णा गजबे आमदार
2. गडचिरोली - देवराव होळी भाजपचे आमदार
3. गोंदिया - विनोद अग्रवाल आमदार अपक्ष
4. भंडारा - अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर आमदार
5. चिमूर - भाजपचे कीर्तिकुमार भांगडिया आमदार
6. बल्लारपूर - भाजपचे सुधीर मुंगटीवार आमदार
7. चंद्रपूर - किशोर जोर्गेवार अपक्ष आमदार
8. रामटेक - आशिष जैस्वाल अपक्ष म्हणून आमदार ( शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा )
9. कामठी - सध्या भाजपचे टेकचंद सावरकर आमदार
10. दक्षिण नागपूर - सध्या भाजपचे मोहन मते आमदार
11. अहेरी - धर्मराव बाबा आत्राम राष्ट्रवादी अजित पवार गट
12. भद्रावती वरोरा - काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आमदार मात्र सध्या लोकसभेवर
नाशिक पश्चिमच्या जागेवरूनही वाद?
मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पश्चिम या जागेवरूनही काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद चालू आहे. नाशिक पश्चिमच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गटाने सुधाकर बडगुजर यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. नाना पटोले यांनी जेव्हा नाशिक पश्चिमचा आग्रह केला तेव्हा संजय राऊत यांनी रात्रीच्या बैठकीतून जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता मविआच्या जागावाटपाचे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! शरद पवारांच्या पक्षाची 'या' एका जागेसाठी वेगळी भूमिका; मविआत वादाची ठिणगी?
शरद पवारांच्या पक्षाची 'या' एका जागेसाठी वेगळी भूमिका; मविआत वादाची ठिणगी?