(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! शरद पवारांच्या पक्षाची 'या' एका जागेसाठी वेगळी भूमिका; मविआत वादाची ठिणगी?
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा मुद्दा अजूनही निकाली लागलेला नाही. दरम्यान, आता शरद पवार यांच्या पक्षाच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
मुंबई : महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) एकीकडे जागावाटपाची चर्चा होत आहे. तर दुसरीकडे अजूनही काही जागांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. 20 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीच्या अनेक बैठका पार पडल्या. या बैठकांत अनेक महत्त्वाच्या जागांवर चर्चा झाली. रात्री उशिरा एक वाजेपर्यंत या बैठका चालू होत्या. या बैठकसत्रांनंतर महाविकास आघाडीचे जागावाटपाचे त्रांगडे सुटले आहे, असे म्हटले जात होते. मात्र आता शरद पवार यांच्या पक्षाच्या (Sharad Pawar Party) भूमिकेमुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांच्या पक्षाने नेमकी काय भूमिका घेतली?
शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगोला या मतदारसंघासाठी शरद पवार यांचा पक्ष वेगळी भूमिका घेणार आहे. हा पक्ष शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) नेते बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा देणार आहे. रोहित पवार यांनीच तशी माहिती दिली आहे. त्यामुळे याच सांगोल्याच्या जागेवरून मविआत वाद होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेमका वाद का होणार?
सांगोला हा मतदारसंघ महाविकास आघाडीमधील वादाचे कारण होऊ शकतो. कारण दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या पक्षातील नेते दीपक आबा साळुंखे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून दीपक साळुंखे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच सांगोल्यातून ठाकरे यांच्या पक्षाचे दीपक साळुंखे हे महाविकास आघाडीचे उमेदवार होण्याची शक्यता आहे. तशी तयारीदेखील साळुंखे यांनी केली आहे. मात्र शरद पवार यांचा पक्ष या जागेसाठी शेकापचे बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा देणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
ठाकरेंच्या पक्षाची तातडीची बैठक
महाविकास आघाडीत जागावाटपाची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र अजूनही काही जागांवर तोडगा निघालेला नाही. विदर्भातील काही जागांसाठी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात वाद चालू असल्याचे म्हटले जात आहे. विदर्भात काँग्रेसची ताकद जास्त आहे. त्यामुळे या भागात आम्हालाच जास्त जागा मिळायला हव्यात, अशी काँग्रेसची भूमिका आहे. तर आम्हाला या भागात 12 जागा मिळाव्यात अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेची आहे. काँग्रेस विदर्भात शिवेसेनेला 8 जागा देण्यासाठी तयार आहे. याच मुद्द्यावर महाविकास आघाडीत वाद चालू असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा :