ठाकरे, काँग्रेसला रोखण्यासाठी भाजपाची मोठी खेळी, विधानसभा निवडणुकीत वीर सावरकरांचा मुद्दा केंद्रस्थानी आणणार?
आगामी विधानसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन भाजपाने कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयश लक्षात घेऊन भाजपाने आतापासूनच विधानसभेची तयारी चालू केली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. पुढच्या काही दिवसांत या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन सध्या राज्यातील प्रादेशिक, राष्ट्रीय पक्ष तयारीला लागलेले आहेत. लोकसभा निवडणुकीतील खालावलेली कामगिरी लक्षात घेता भाजपाकडून आतापासूनच या निवडणुकीसाठी आक्रमक रणनीती आखण्यात येत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा समोर आणण्याच्या तयारीत आहे. तशी रणनीती भाजपाने आखल्याचं वृत्त लोकसत्ता या मराठी वृत्तपत्राने दिलं आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा समोर आणला जाणार
मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसेचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा समोर आणला जाणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी देशाचे संविधान धोक्यात असल्याचा प्रचार केला होता. या रणनीतीचा त्यांना देशभरात फायदा झाला. आता राज्यातील विधानसभा निवडणुकीतही विरोधक हाच मुद्दा लावून धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांची ही रणनीती निष्प्रभ करण्यासाठी भाजपाकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा समोर आणला जाणार आहे.
सावरकरांवर काँग्रेस, शिवसेनेची (ठाकरे गट) वेगवेगळी भूमिका
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान तसेच इतरही अनेक प्रसंगी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीकात्मक भाष्य केलेले आहे. सावरकरांचा उल्लेख करत त्यांनी सत्ताधारी भाजपावर टीका केलेली आहे. त्यानंतर वेळोवेळी भाजपानेही आक्रमक होत त्यांना माफी मागण्याची मागणी केलेली आहे. राहुल गांधी यांची सावरकर यांच्याविषयीची भूमिका आम्हाला मान्य नाही, असे ठाकरे गटाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) हे दोन्ही पक्ष देशपातळीवर इंडिया आघाडी आणि राज्य पातळीवर महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आहेत. मात्र सावरकरांच्या मुद्द्यावर या पक्षातील शीर्षस्थ नेत्यांची मतं वेगवेगळी आहेत. हीच बाब लक्षात घेऊन भाजपाकडून विधानसभा निवडणुकीत आक्रमक पवित्रा धारण केला जाण्याची शक्यता आहे. सावरकर यांचा मुद्दा समोर आणून महाविकास आघाडीची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे.
विरोधकांकडूनही उचलले जाणार 'हे' मुद्दे
दरम्यान, दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) तसेच राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत संविधानासह महागाई, बेरोजगारी, देशातील अस्थिरता, जातिनिहाय जनगणना हे मुद्दे समोर आणले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
महायुतीत बार्गेनिंगची लढाई; शिंदेंच्या शिवसेनेचं मिशन 100; विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती