महायुतीत बार्गेनिंगची लढाई; शिंदेंच्या शिवसेनेचं मिशन 100; विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती
महायुतीमध्ये अद्यापही जागावाटपाबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र, शिवसेना शिंदे गटाने 100 जागांसाठी कंबर कसल्याची माहिती आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकानंतर आता विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. पावसाळ्यानंतर विधानसभा निवडणुकांची पडघम वाजू लागणार असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यानुसार, काही मतदारसंघातून उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तबही केलं जात आहे. मात्र, यंदाची विधानसभा निवडणूक अधिक रंजक ठरणार आहे, कारण शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट. राज्यातील दोन प्रमुख पक्षातील फुटीनंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक असणार आहे. त्यात, महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना यंदा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे, महायुतीमधील कोणते पक्ष किती जागा लढणार, आणि महाविकास आघाडीतील कोणते पक्ष किती जागा लढणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, सर्वच पक्षांकडून आपली बार्गेनिंग पॉवर वाढविण्याचं काम सुरू आहे. त्यातच, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेना (Shivsena) 100 जागांवर निवडणुका लढवण्याची तयारी करत आहे.
महायुतीमध्ये अद्यापही जागावाटपाबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र, शिवसेना शिंदे गटाने 100 जागांसाठी कंबर कसल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्रित आहेत. त्यामुळे, या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटप होईल, त्यात भाजपचे सर्वाधिक आमदार असल्याने भाजप सर्वाधिक जागा लढवेल, त्यानंतर शिवसेना शिंदे गट व तिसऱ्या क्रमांकावर अजित पवारांची राष्ट्रवादी जागा लढवू शकते. मात्र, शिवसेना शिंदे गट व आम्हाला समसमान जागा देण्यात याव्यात, अशी मागणीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीरपणे केली होती. त्यामुळे, जागावाटपाची अडचण कशी दूर होणार हा खरा प्रश्न आहे.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून राज्यातील 100 विधानसभा मतदारसंघात आढावा घेतला जात आहे. एकनाथ शिंदेंनी विधानसभा मतदारसंघातील निरीक्षकांची यादीच जाहीर केली असून निरीक्षकांना संबंधित विधानसभा मतदारसंघात पाठवण्यात आले आहे. त्यानुसार, पक्षाचे पदाधिकारी सध्या मतदारसंघात जाऊन चाखाचोळा घेत आहेत. शिवसेना पदाधिकारी व मंत्र्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना याबाबतचा अहवाल देण्यात येईल. त्यानुसार, कोणत्या मतदारसंघात पक्षाचं स्थान बळकट आहे, उमेदवाराला पसंती आहे याची माहिती होईल. त्यानंतर, अंतिम निर्णय होणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी भाजप नेते व गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीत जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, भाजपकडून 150 जागांवर दावा केला जात आहे, आता शिंदे गटाकडून 100 जागांवर चाचपणी सुरू असून 100 जागा लढवण्याचा दावा केला जात आहे. शिवसेनेकडून महायुतीत दबावतंत्राचं राजकारण केलं जात असल्याने, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार हाही प्रश्नच आहे.
सद्यस्थितीत कोणाकडे किती आमदार
महायुती सरकारमध्ये भाजप हाच सर्वात मोठा पक्ष आहे. महायुतीमधील भाजप पक्षाकडे 105 आमदार आहेत. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 42 आमदारांचे संख्याबळ आहे. पण, मुख्यमंत्री असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडे 40 आमदारांची संख्या आहे. त्यामुळे, आमदारांच्य संख्येचा विचार केल्यस शिंदेंचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. महायुतीला सत्ता स्थापनेसाठी 144 जागांवर विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे, हा मॅजिक फिगर गाठण्यासाठी महायुतीत कोणत्या पक्षाला किती जागांवर संधी मिळते हे पुढील काही महिन्यांत स्पष्ट होईल.
2019 ची स्थिती काय होती
राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर राजकीय समीकरणे बदलली. 2019 मध्ये शिवसेनेला 65 जागांवर विजय मिळाला होता. त्यावेळी, शिवसेनेनं 127 जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र, एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र होती. त्यामुळेच, शिवसेनेनं जिंकलेल्या 65 जागा व दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या 56 जागांवर शिवसेना शिंदे गटाची नजर आहे. त्यातूनच, महायुतीत 100 जागांचा प्रस्ताव शिवसेनेकडून ठेवला जाणार असल्याचे समजते.