Video: आता, मी पण प्रोफेशनल होणार; निलेश लंकेंनी सांगितला शरद पवारांच्या 'फोनचा किस्सा'
आता मी पण प्रोफेशनल होणार आहे, थोरातसाहेबांच्या सहवासात आल्यावर त्यांना असं जमत नाही. त्यात पवारसाहेबांना तर हे अजिबात आवडत नाहीत.
![Video: आता, मी पण प्रोफेशनल होणार; निलेश लंकेंनी सांगितला शरद पवारांच्या 'फोनचा किस्सा' Video: Now, I too will be a professional; Nilesh Lanke told on Sharad Pawar's 'phone story' in ahmednagar in front of balasaheb thorat Video: आता, मी पण प्रोफेशनल होणार; निलेश लंकेंनी सांगितला शरद पवारांच्या 'फोनचा किस्सा'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/19/4bc155b038d2b0acfd6a4f31003c009617187882731251002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : लोकसभा निवडणुकांच्या विजयानंतर निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पहिल्यांदाच फेटा बांधला. कारण, जोपर्यंत बाळासाहेब थोरात यांना विजयाचा फेटा बांधत नाही, तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, असा पणच लंकेंनी केला होता. त्यामुळे, मंगळवारी संगमनेर येथे आयोजित सत्कार समारंभात निलेश लंकेंनी फेटा बांधल्यानंतर लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यामुळेच आपण विजयी झाल्याचं म्हटलं. थोरात यांची रणनिती आपल्या कामी आले, लोकसभा निवडणुकीच्या महाभारतातील ते श्रीकृष्ण आहेत, अशा शब्दात लंकेंनी थोरात यांच्या कुशल रणनितीचं कौतुक करत आभार मानले. निलेश लंकेंनी येथील भाषणातून तुफान फटकेबाजी केली. यावेळी, पुण्यातील गुंड गज्या मारणेंच्या भेटीवरुन झालेल्या राड्यावरही अप्रत्यक्षपणे बोलले. तसेच, मला काही दिवसांपूर्वी शरद पवारसाहेबांचा (Sharad Pawar) फोन आला होता, त्यांनीही समज दिली. आता, मी पण फ्रोफेशनल वागणार असल्याचं लंकेनी म्हटलं.
आता मी पण प्रोफेशनल होणार आहे, थोरातसाहेबांच्या सहवासात आल्यावर त्यांना असं जमत नाही. त्यात पवारसाहेबांना तर हे अजिबात आवडत नाहीत. त्यादिवशी मला पवारसाहेबांचा फोन आला. म्हणाले, आरं चुकून कुठं बी नको ना जात जाऊ... मी म्हटलं काय साहेब मला माहिती नव्हत, कुणाच्या कपाळावर लिहलंय का, मी तर भोळा माणूस आहे. कोणाच्या घरी चहा प्यायला जायचं,पाहुण्याच्या घरी पाणी प्यायला जायचं. पण, ठेस लागल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही ना, असे म्हणत पुण्यातील गंड गज्या मारणे यांच्या भेटीवरुनही निलेश लंकेंनी भाषणातून फटकेबाजी केली.
आता मी थोडं बदलायचं ठरवलं आहे, कसं आता विचारवतंत व्हायचं आहे तुमच्यासारखं, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांच्याकडे बोट दाखवलं. मी विचारवंत नाही व्हायचो, पण तुम्ही जो विश्वास टाकलाय ना, त्या विश्वासाला तडा जाणार नाही. निश्चित काहीतरी वेगळं करुन दाखवेल, असे निलेश लंके यांनी म्हटले. मी शेवटचा श्वास घेईल, त्या दिवशीच थोरात यांना विसरेल. थोरात साहेबांनी आत्तापर्यंत अनेक निवडणुका जिंकल्या मात्र माझ्या विजयाचा आनंद हा त्या सगळ्यांपेक्षा जास्त आहे याचा मला विश्वास. मला अजूनही वाटत नाही मी खासदार झालो. मात्र, तुम्ही सत्कार केला, त्यानंतर आता मला खात्री पटली, असेही लंकेंनी म्हटले.
सुजय विखेंना टोला
लवकरच दुधाचं मोठा आंदोलन केलं जाईल. एकाही मंत्राला जिल्ह्यात फिरू देणार नाही. माझं लोकसभेतलं पहिला भाषण इंग्रजीतच असेल. सगळ्यांनी टीव्ही चालू करून बसा मग कळेल मी इंग्रजी बोललो की उर्दू बोललो.. असे म्हणत निलेश लंकेंनी सुजय विखेंना टोलाही लगावला.
किंग होणं सोप्प, पण किंगमेकर होणं अवघड
मी विजयी झालो मात्र विजयाचा आनंद आज मिळाला. विजयानंतर मी आजपर्यंत कोणालाही फेटा बांधू दिला नाही. मी सुध्दा यांच्यापेक्षा (थोरात)दहा पट हट्टी आहे. कौरव पांडवांच्या युद्धात पांडवांचा विजय श्रीकृष्णामुळे झाला. माझ्या निवडणुकीत श्रीकृष्णाची भूमिका पार पाडली ते एकमेव बाळासाहेब थोरात. माझ्या मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांची यंत्रणा काम करत होती. त्यांनी काय काय काम केलं, हे मला निकालानंतर सगळं समजलं. मी विजयी झालो त्यावेळेस बाळासाहेब थोरात आजारी होते. त्यांना खूप आग्रह केला मात्र ते येऊ शकले नाहीत. गाडीत सलाईन घ्या.. इंजेक्शन मारा..मात्र या.. असा माझा आग्रह होता. म्हणूनच, ज्या माणसाने मला दिल्ली दाखवली त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज संगमनेर मध्ये आलोय. किंग होणं सोप्प मात्र किंगमेकर होणं अवघड, अशा शब्दात आपल्या विजयाचे किंगमेकर बाळासाहेब थोरात असल्याचे लंके यांनी म्हटलं.
मी थोरातांना सॅल्यूट करतो
माझ्या विजयात किंगमकरची भूमिका बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केली. उमेदवारावर विश्वास नसतानाही थोरात यांनी त्यांची यंत्रणा राबवून हा विजय संपादन केला. माझ्या निवडणुकीचा रिमोट बाळासाहेब थोरात यांच्याकडे होता. विरोधकांकडे सीसीटीव्ही कॅमेरा होता. मात्र माझ्याकडे ड्रोन कॅमेरा होता. मला वाटायचं मी हुशार, मात्र थोरात साहेबांची यंत्रणा पाहिल्यावर मला माझी लायकी समजली. माझ्या निवडणुकीचा खरा निकाल थोरात यंत्रणेमुळे मला मिळत होता. मी थोरात यांना धन्यवाद नव्हे तर सॅल्यूट करतो. कारण, विरोधकांची निम्मी यंत्रणा माझ्याबरोबरच होती. मी आता प्रोफेशनल होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)