(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vasant More: शरद पवारांना भेटले पण पक्षप्रवेश केला नाही, वसंत मोरेंच्या डोक्यात वेगळाच प्लॅन, पुण्यात कसब्याची पुनरावृत्ती होणार?
Maharashtra Politics: मनसेच्या इंजिनाची साथ सोडलेल्या तात्यांनी तुतारी हातात का घेतली नाही? शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होता होता राहिला. वसंत मोरे पक्षप्रवेश न करताच माघारी का परतले? जाणून घ्या सर्वकाही.
पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकारणाला प्रचंड वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वीच मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे (Vasant More) यांनी गुरुवारी पुण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. ते शरद पवार गटाच्या कार्यालयात पोहोचल्याने सुरुवातीला वसंत मोरे पक्षप्रवेश करणार अशी चर्चा होती. परंतु, शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर वसंत मोरे पक्षप्रवेश न करताच माघारी परतले. त्यांच्या या कृतीने अनेकजण बुचकाळ्यात पडले. त्यामुळे वसंत मोरे यांच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लॅन घोळत आहेत का, अशी चर्चा आता रंगली आहे.
वसंत मोरे यांनी बुधवारीच आपल्याला सर्वपक्षाच्या नेत्यांकडून फोन आल्याचे सांगितले. यामध्ये संजय राऊत, मुरलीधर मोहोळ, मोहन जोशी यांचा समावेश होता. परंतु, आज वसंत मोरे हे शरद पवारांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचल्याने ते पक्षप्रवेश करणारच, अशी खात्री अनेकांना पटली. परंतु, काहीवेळातच वसंत मोरे कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, मी याठिकाणी पक्षप्रवेशासाठी आलेलो नाही. मला सुप्रियाताईंना आज भेटीसाठी वेळ दिली होती, त्यामुळे मी आज याठिकाणी आलो होतो. मी काँग्रेसच्या मोहन जोशी यांच्याशी चर्चा केली आहे. शिवसेना नेत्यांशीही माझे बोलणे झाले आहे. पुण्यात एक वेगळा प्रयोग करु शकतो. कसब्याची पुनरावृत्ती करायची असेल तर त्यासाठी पुणे लोकसभेचा उमेदवार वसंत मोरे कशाप्रकारे असू शकतो, हे पवार साहेबांना सांगायला आलो होतो. मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहे, हे मी शरद पवारांना सांगितले आहे. ते महाविकास आघाडीतील मोठे नेते आहेत. ते ही गोष्ट समजू शकतात. मविआतील इतर नेत्यांनाही ते ही गोष्ट समजवू शकतात. त्यामुळे मला माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील, असे वसंत मोरे यांनी सांगितले.
पुण्यातून कोणाला लोकसभेची उमेदवारी?
भाजपने नुकतीच महाराष्ट्रातील 20 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यामध्ये भाजपने पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात महाविकास आघाडी कोणाला रिंगणात उतरवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मविआच्या जागावाटपात पुण्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला येईल. त्यामुळे काँग्रेस वसंत मोरे यांच्यासाठी पुणे लोकसभेवरील दावा सोडणार का? महाविकास आघाडी मोरेंच्या पाठिशी एकत्रपणे ताकद उभी करणार का, हे आता पाहावे लागेल.
आणखी वाचा
राज ठाकरेंची पुण्यातील ताकद, मनसेचे फायरब्रँड नेते, पक्षाला 'जय महाराष्ट्र', कोण आहेत वसंत मोरे?