उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा खून केला; आशिष शेलारांचा हल्लाबोल, मनोज जरांगेंनाही टोला
महाविकास आघाडीतील शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करावी.
![उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा खून केला; आशिष शेलारांचा हल्लाबोल, मनोज जरांगेंनाही टोला Uddhav Thackeray Killed Maratha Reservation, BJP Ashish Shelar Hallobol on thackeray and Manoj Jarange taunt too उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा खून केला; आशिष शेलारांचा हल्लाबोल, मनोज जरांगेंनाही टोला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/21/e4a6d4149c5155a8753c241728f2ccca17215676904701002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून मराठा समाजाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे (manoj Jarange) पाटील यांनी 20 जुलैपासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेली 1 महिन्याची मुदत संपल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जालन्यातली अंतरवाली येथून उपोषणाला सुरुवात करत सरकारवर निशाणा साधला. मात्र, मनोज जरांगे हे केवळ देवेंद्र फडणवीसांवरच टीका करत असल्याचा आरोप भाजप नेते करत आहेत. त्यावरूनही जरांगे भाजप नेत्यांवर शिवराळ भाषेत पलटवार करताना दिसून येतात. त्यातच, आज भाजपच्या अधिवेशनातही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच मराठा आरक्षणाचा खून केलाय, अशा शब्दात आशिष शेलार यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं.
महाविकास आघाडीतील शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करावी. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणास तुमचा पाठिंबा आहे का, हे जाहीर करावे, असे आव्हानच देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील मेळाव्यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले. तसेच, मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजाला झुलवत ठेवण्याचं काम यांच्याकडून होत असल्याचा गंभीर आरोपही फडणवीसांनी केला. तर, आशिष शेलार यांनीही आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरेंना लक्ष्य केलं. देवेंद्र फडणवीसांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, याची आठवणही त्यांनी करुन दिली.
उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा खून केला
मराठा आरक्षणाला भाजपचे समर्थन आहे, आमच्या देवेंद्र फडणवीस यांनी कायदा केला पण माशी शिकली कुठे?, मराठा आरक्षणाचा खून उद्धव ठाकरेंनी केला, यांनी बाजू मांडली नाही, अशा शब्दात आशिष शेलार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरेंना लक्ष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणाऱ्यांनी नक्की उपोषण करावे, पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर का बोलत नाहीत, असा सवालही नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांच्यावरही निशाणा साधला.
देशातील संपूर्ण राज्यात एकमेव पक्ष भाजप
मोदी तिसऱ्यांदा निवडून आले त्याच्या अभिनंदन प्रस्ताव आहे, राज्यात आपल्याला अपेक्षित यश मिळाले नाही. लोकसभेला कार्यकर्ता म्हणून जे लक्ष समोर ठेवलं ते आपण पूर्ण करू शकलो नाही. तिसऱ्या डोळ्याने आपण जर या लोकसभेचे विश्लेषण केले तर कुणीही सोम्या गोम्या एकत्र येऊन सुद्धा मोदींना हरवू शकले नाहीत हे स्पष्ट झालंय, असे आशिष शेलार यांनी आपल्या भाषणात म्हटले. सकाळी न सांगता येणारे पत्रकार पोपट लाल म्हणत होते की मोदी ब्रँड संपला आहे. पण, देशातल्या सर्व राज्यात आपण निवडून आलो. काही लोक पाच ठिकाणी आले, काही लोक एका जागेपूरते आले पण संपूर्ण राज्यात फक्त एकमेव पक्ष आहे तो म्हणजे भाजप.
पोपटलाल म्हणत संजय राऊतांवर टीका
जगभरात मोदींचे चाहते वाढलेले आहेत, बायडन आणि ट्रम्प यांना देखील मोदींनी मागे टाकले आहे. मोदी आणि भाजपचे यश हे तुमच्या माझ्यासाठी प्रेरणा देणारे आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, पण भारत आज विश्वगुरू आहे. कुठलाही देश असो मदत करतो तो भारतच. पत्रकार पोपटलाल संजय राऊत हे आहे मोदी ब्रँड, असे म्हणत आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर काँग्रेसच्या काळात लिलावात गेले होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)