(Source: ECI/ABP News/ABP Majha)
''... तर आम्ही सहन करणार नाही'', अजित पवारांसमोरच तानाजी सावंतांचा इशारा; दादांचंही प्रत्युत्तर
महाविकास आघाडीमध्ये धाराशिवची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेना सुटली असून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
धाराशिव - लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा सर्वच मतदारसंघात धडाडत आहेत. उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्यासाठी बड्या नेत्यांची फौजही विविध मतदारसंघात पाहायला मिळत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यातच, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाला आज सुरुवात झाली असून तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी (Voting) उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळेच, धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासाठी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री तानाजी सावंत धाराशिवमध्ये आले होते. यावेळी, दोन्ही नेत्यांमध्ये धाराशिवच्या जागेवरुन जुगलबंदी पाहायला मिळाली.
महाविकास आघाडीमध्ये धाराशिवची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेना सुटली असून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, महायुतीकडून राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून अजित पवारांचे नातलग असलेल्या अर्चना पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.या जागेसाठी शिवसेना शिंदे गटही आग्रही होती. कारण, आजपर्यंतच्या गेल्या 28 वर्षातील इतिहासात ही जागा शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाला मिळाली आहे. मात्र, यंदा शिवसेनेत फुट पडल्यानंतर महायुतीकडून राष्ट्रवादीने जागेवर आपला दावा सांगितला. पण, पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्त्वात शिवसेना शिंदे गटाने आग्रही होत जागेवर दावा केला होता. महायुतीमधील सखोल मंथनानंतर ही जागा राष्ट्रवादीला देण्यात आली. त्यामुळे, आजच्या भाषणातच व्यासपीठावरुन तानाजी सावंत यांनी मनातील खंत बोलून दाखवली.
जानेवारी महिन्यातच प्रचार सुरू केला
धाराशिवच्या या जागेसाठी जानेवारी महिन्यातच प्रचार सुरू झालेला आहे, 26 जानेवारीपासूनच धनंजय सावंत यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. हा मतदार पारंपारिक पद्धतीने कडवट शिवसैनिकांचा मतदार आहे, शिवसेनेचा बाणा या मतदारसंघात आहेत. मात्र, महायुतीच्या नेत्यांनी निर्णय घेतल्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात आला. त्यामुळे, समोरच्याचा फडशा पाडण्यासाठी महायुतीच्या व्यासपीठावर आम्ही येऊ. पण, अशाच पद्धतीने माझ्या शिवसेनेचा एकेक मतदारसंघ कमी होत राहिला तर, हा शिवसैनिक आणि आम्ही स्वत: हे सहन करणार नाही. कारण, हा मतदारसंघ पारंपारिक शिवसेनेचा आहे, येथील खासदार 8 वेळा शिवसेनेचा राहिला आहे. हा माझ्या तमाम शिवसैनिकांवर अन्याय आहे. मात्र, विश्वनेता नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला अर्चना पाटील यांना लीड देऊन विजयी करायचं आहे, असे तानाजी सावंत यांनी धाराशिवच्या व्यासपीठावरुन म्हटले.
तानाजी सावंत यांनी अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत परखडपणे आपली भूमिका मांडली. हा मतदारसंघ शिवसेनेकडून सुटल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. त्यानंतर, आपल्या भाषणात अजित पवारांनीही तानाजी सावंत यांना प्रत्युत्तर दिलंय.प्रत्येकाला वाटतं मला संधी मिळावी, पण जागा मर्यादित असतात. त्यात, तानाजी सावंत यांचे पुतणे हेही प्रयत्न करत होते. मात्र, जागा एकच असते, त्याकरिता हा निर्णय घेतला असे म्हणत अजित पवारांनी त्याच व्यासपीठावरुन तानाजी सावंतांना प्रत्युत्तर दिलं.
शरद पवारांच्या विधानावरुन टोला
अजित पवारांनी आपल्या भाषणातून पुन्हा एकदा शरद पवारांच्या विधानावरुन टोला लगावला. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, लोकांचे काम झाले पाहिजे. धाराशिवकरांनी यापूर्वी पद्मसिंह पाटील यांना निवडून दिलं होतं. आता, अर्चना पाटील यांना निवडून द्या. म्हणजे, यापूर्वी सासूला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या. चार दिवस सासूचे असतात, आता सुनेचे दिवस आले आहेत, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना चिमटा काढला. तसेच, ही आपली घरची सून आहे. पण, काही लोकं बाहेरची सून म्हणतात. कुठल्याही सुना घरच्याच असतात, कधीही सुनेला बाहेरचं समजायचं नसतं. माझ्या आया-बहिणींना याचा विचार केला पाहिजे, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांन नाव न घेता टोला लगावला.