Sushma Andhare On Prajakta Mali: प्राजक्ता माळी आरएसएसच्या मुख्यालयात जातात तेव्हा...; सुषमा अंधारेंच्या विधानाने चर्चांना उधाण
Sushma Andhare On Prajakta Mali: सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाशी बोलताना प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.
Sushma Andhare On Prajakta Mali: बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या दरम्यान भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेत केलेल्या वक्तव्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचारही घेतला.
आपपासांतील राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये, अशा शब्दांत भूमिका स्पष्ट करणाऱ्या प्राजक्ता माळीने सुरेश धस यांनी आपली जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. याचदरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एबीपी माझाशी बोलताना प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.
मित्र स्पष्टीकरण मागत नाही आणि शत्रू त्यावर विश्वास ठेवत नाही- सुषमा अंधारे
सत्याला स्पष्टीकरणाची गरज आहे. प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घ्यावी, हेच मला पटलेलं नाही. प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद का घ्यावी?, कोणाला सांगायचं आहे?, मित्र स्पष्टीकरण मागत नाही आणि शत्रू त्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे विषय सोडून द्यायला हवा होता. पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याऐवढा असं बोलून सोडून द्या, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
प्राजक्ता माळी आरएसएसच्या मुख्यालयात जातात तेव्हा...
तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचंच होतं तर करुणा मुंडे यांनी खरं आक्षेपार्ह विधान केलं होतं. पण तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही. त्यांनी त्यावेळी दुर्लक्ष केलं होतं. आताही त्या दुर्लक्ष करू शकल्या असत्या. आता त्यांनी पत्रकार परिषद घेणं पॉलिटिकल मोटिव्हेटेड वाटते. जेव्हा सुषमा अंधारेंविरोधात बोललं गेलं तेव्हा का सुचलं नाही? सुरेश धस यांच्याविषयी जी आखपाखड चालली आहे, ते सुरेश धस कोणत्या पक्षाचे? तुम्हाला सुरेश धस यांच्याविरोधात आगपाखड करण्याची गरजच नाही. सुरेश धस भाजपाचे आहेत. भाजपाची संस्था आरएसएस आहे. प्राजक्ता माळी आरएसएसच्या मुख्यालयात जातात तेव्हा त्या कलाकार राहत नाही. कारण तेव्हा त्यांचा स्वतःचा एक पॉलिटिकल स्टॅण्ड तयार होतो. त्यांचा राजकीय दृष्टीकोन तयार होतो, असं सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं.