Vande Mataram Row : सुधीर मुनगंटीवार यांच्या पहिल्याच घोषणेने वाद; रझा अकादमीचा विरोध, शिंदे गटाचीही गोची?
Vande Mataram Row : फोनवर आता 'हेलो' ऐवजी 'वंदे मातरम्' म्हणावं लागेल असा आदेश देत असल्याची घोषणा सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्याच दिवशी केली. मात्र हिच घोषणा आता वादग्रस्त ठरु लागली आहे.
Vande Mataram Row : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळातील नवनियुक्त वरिष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना सांस्कृतिक विभागाची जबाबदारी देण्यात आली. आता फोनवर 'हेलो' (Hello) ऐवजी 'वंदे मातरम्' (Vande Mataram) म्हणावं लागेल असा आदेश मी सरकारी कर्मचाऱ्यांना देत असल्याची घोषणा सुधीर मुनगंटीवार पहिल्याच दिवशी केली. मात्र हीच घोषणा आता वादग्रस्त ठरु लागली आहे. रझा अकादमीने या घोषणेला विरोध केला आहे. शिवाय शिंदे गटाच्या समोरील अडचणीही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.
रझा अकादमीचा विरोध
आता फोन वर 'हेलो' म्हणायचं नाही तर त्याऐवजी 'वंदे मातरम्' म्हणावं लागेल आणि हाच निर्णय मी इथून जाहीर करतो, असं सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून जाहीर केलं. मात्र हाच निर्णय आणि हीच घोषणा आता वादग्रस्त ठरताना पाहायला मिळत आहे. आमच्याकडे फक्त अल्लाहची पूजा केली जाते. त्यामुळे सर्वसामान्यांना जो शब्द मान्य असेल असा शब्द द्यावा, अशी मागणी रझा अकादमीने करत या निर्णयाला विरोध केला आहे.
वंदे मातरम् म्हणण्यामागचा हेतू काय हे विचारु, मग भूमिका घेऊ : अजित पवार
'हेलो' या शब्दाला पर्यायी शब्द हा पहिल्यांदाच नाही तर महाविकास आघाडीच्या सरकारने सुद्धा दिला होता. महाविकास आघाडीचे सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांशी बोलताना 'जय महाराष्ट्र'ने सुरुवात करत होते. कारण शिवसेनेची ती एक परंपरा राहिली आहे. त्यामुळे वंदे मातरम् म्हणण्यामागे नेमका काय हेतू आहे, ते सभागृहात आम्ही सत्ताधाऱ्यांना विचारु आणि त्यानंतर आम्ही भूमिका घेऊ, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं.
शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांची गोची?
या निर्णयाला विरोध रझा अकादमीचा तर आहेच मात्र शिंदे गटाच्या आमदारांची आणि मंत्र्यांची ही गोची होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेत पूर्वीपासून 'जय महाराष्ट्र' म्हणण्याची परंपरा आहे. त्यामुळे शिंदे गटातील मंत्री असतील किंवा आमदार असतील हेही आता जय महाराष्ट्र म्हणणार की वंदे मातरम् असा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
वंदे मातरम् आणि वाद
वंदे मातरम् या घोषणेचा किंवा वाक्याचा वाद हा पहिल्यांदाच निर्माण झालेला नाही तर याआधी सुद्धा भाजप आमदार आणि एमआयएमच्या आमदारांचा वाद अधिवेशनात जगजाहीर आहे. "इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा," असं म्हणत भाजप आमदारांनी अनेकदा अधिवेशन काळात सभागृह बंद पाडलेलं पाहायला मिळत होतं. त्यामुळे वंदे मातरम् वरुन पुन्हा एकदा वाद निर्माण होताना पाहायला मिळत आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्तेत सोबत असलेल्या शिंदे गटातील आमदार, खासदार आणि मंत्री वंदे मातरम् म्हणणार की शिवसेनेच्या परंपरेनुसार जय महाराष्ट्र म्हणणार हेही पाहण तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे.