Siddaramaiah : आमच्या 50 आमदारांना 50-50 कोटींची ऑफर, सिद्धारामय्यांचा भाजपवर आरोप, कर्नाटकात पु्न्हा ऑपरेशन लोटसच्या चर्चा
Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री एम. सिद्धारामय्या यांनी भाजपकडून सरकार पाडण्यासाठी आमदारांना 50-50 कोटींची ऑफर दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Siddaramaiah Accused BJP बंगळुरु: कर्नाटकमधील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस सुरु असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री एम. सिद्धारामय्या यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे. भाजपकडून काँग्रेसच्या 50 आमदारांना 50-50 कोटी रुपये देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. कर्नाटकमध्ये भाजपची कधी स्वबळावर सत्ता आली नाही, ते ऑपरेशन लोटस करुन सत्तेत आले, असं सिद्धारामय्या म्हणाले.
मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी आरोप करत म्हटलं की काँग्रेसच्या 50 आमदारांना 50-50 कोटी रुपयांची ऑफर देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे पैसे कुठून येतात, हे पैसे येडियुरप्पा, बोम्मई, आर. अशोक यांनी छापलेत का? हे जे पैसे आहेत ज्याद्वारे राज्याला लुटण्यात आलं,असं मुख्यमंत्री सिद्धारामय्या म्हणाले.
काँग्रेसविरुद्ध भाजपकडून षडयंत्र होत असल्याचा आरोप
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. “ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि राज्यपालांचा दुरुपयोग करुन भाजप आमच्या विरुद्ध षडयंत्र करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पहिल्यांदा केजरीवाल यांना लक्ष्य करण्यात आलं आणि आता मला आणि माझ्या पत्नीला लक्ष्य केलं जातंय, असं ते म्हणाले. सिद्धारामय्या टी. नरसीपूर विधानसभा मतदारसंघात विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
भाजप आणि केंद्रापुढं झुकणार नाही
सिद्धारामय्या म्हणाले मी काल परवापासून मुख्यमंत्री नाही, गेल्या 40 वर्षांपासून या क्षेत्रात आहे. माझ्या विरुद्ध खोट्या केसेस केल्या जात आहेत. राज्यातील जनता मूर्ख नाही, जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. मी भाजप आणि केंद्र सरकारच्या षडयंत्रापुढं झुकणार नाही. भाजपनं काँग्रेसच्या आमदारांना खरेदी करण्यासाठी 50-50 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला होता. मात्र, आमच्या आमदारांनी ती ऑफर धुडकावली, असं ते म्हणाले. भाजप आणि जेडीएसकडून सरकारच्या योजनांचा अपप्रचार केला जात असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक मे 2023 मध्ये झाली होती. त्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळावर सत्ता मिळवली होती. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांपैकी 135 जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या. तर, भाजपला केवळ 66 जागा मिळाल्यानं सत्ता गमवावी लागली. जनता दल सेक्यूलरला 19 जागांवर विजय मिळाला होता.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसनं सिद्धारामय्या यांना मुख्यमंत्री केलं होतं तर, डीके. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं होतं.
इतर बातम्या :