Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
Makar Sankranti 2025 : नाशिकमध्ये नायलॉन मांजाने एकाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या पाथर्डी परिसरात ही घटना घडली आहे.
Nashik : मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात पतंगबाजी केली जाते. मात्र असे करत असताना प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या वापर नागरिकांच्या जिवावर उठला असल्याचे समोर आले आहे. अशातच नाशिकमध्ये नायलॉन मांजाने एकाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या पाथर्डी परिसरात ही घटना घडली आहे. दरम्यान जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून घोषित केलंय. सोनू किसन धोत्रे अस नायलॉन मांजामुळे मृत्यू झालेल्या 23 वर्षीय युवकाचे नाव आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार गुजरातहुन मोटारसायकलवर घरी येत असताना वाटेतच या युवकावर काळाने घाला घातला अन् नायलॉन मांजामुळे त्याचा गळा कापल्या गेला. ही जखम इतकी जबर होती की उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या मे महिन्यात मृत सोनू धोत्रेचे लग्न होतं. अशातच तो गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी घरी जात असताना पाथर्डी येथे हा अपघात घडला असून आपल्या बहिणीची भेट अपूर्ण राहिली आहे.
नायलॉनमुळे जखमी होण्याचे सत्र सुरूच, 5 वर्षाच्या चिमुकल्यासह दोघे गंभीर
अशीच एक घटना नाशिकच्या येवल्यामध्ये घडली आहे. येवल्यात तीन दिवसीय संक्रांत उत्सवाला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली. मात्र नायलॉन मांजामुळे जखमी होण्याचे सत्र सुरूच आहे. विविध घटनांमध्ये पाच वर्षाच्या चिमुकल्यासह दोन तरुणांचे गळे कापले गेल्याने गंभीर जखमा झाल्या आहेत. कोटमगाव येथे झालेल्या घटनेत देवराज कोटमे या 5 वर्षीय चिमुकल्याच्या नायलॉन मांजामुळे इजा होऊन 14 टाके पडले आहेत, तर पिंपळखुटे येथील शुभम पवार यांना देखील गळ्याला नायलॉन मांजामुळे इजा होवून 20 टाके पडले आहेत.
तर तिसऱ्या घटनेत अंदरसुल येथील दीपक राऊत या तरुणाच्या गळ्याला मांजा अडकून जखम झाल्याने त्यालाही 20 टाके पडले आहेत. प्रशासनाने आवाहन करूनही नायलॉन मांजा सर्रास वापरला जात असून रोजचं नायलॉन मांजामुळे जखमी होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशा अपघाताच्या घटना घडल्या असून यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. परिणामी या प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करूनही छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असल्याचे पुढे आले आहे. अशातच आता नायलॉन मांजाचा वापर, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर संक्रात येणार आहे. कारण नायलॉन मांजाने पतंग उडविणारे मुलं, पालक आणि विक्रेत्यांवर नाशिक पोलिसांकडून 'सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न' करण्याचा गुन्हा दाखल होणार आहे.
हे ही वाचा