Vipul Kadam: श्रीकांत शिंदेंचा मेहुणा भास्कर जाधवांना भिडणार, वर्षावरची खलबतं संपताच विपुल कदम कामाला लागले
guhagar vidhan sabha: श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम (Vipul Kadam) हे यंदा गुहागरमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असू शकतात. विपुल कदम मतदारसंघात सक्रिय झाले आहेत.
रत्नागिरी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. यापैकी गुहागर विधानसभा मतदारसंघ हा सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदु झाला आहे. कारण, गुहागरमधून खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचे मेहुणे विपुल कदम यांनी उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. विपुल कदम (Vipul Kadam) यांच्या उमेदवारीमुळे गुहागर विधानसभा क्षेत्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघातील (Guhagar Vidhan Sabha) पदाधिकारी रविवारी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले होते. यावेळी गुहागर विधानसभेसाठी विपुल कदम यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते.
शिंदे गटाकडून पितृपक्ष संपल्यानंतर विपुल कदम यांची उमेदवारी जाहीर केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, ही बातमी बाहेर येताच विपुल कदम हे कामाला लागल्याचे दिसत आहे. कारण, विपुल कदम यांच्याकडून गुहागरमध्ये 'धर्मवीर-2' या चित्रपटाचे मोफत खेळ आयोजित करण्यात आले आहेत. विपुल कदम यांच्याकडून शहरात याचे फलक लावून जोरदार जाहिरातबाजी केली जात आहे. यानिमित्ताने विपुल कदम हे गुहागरमध्ये पूर्णपणे सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.
गुहागरमधील शृंगारतळी या मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी असलेल्या थिएटरमध्ये धर्मवीर चित्रपटाचे स्क्रीनिंग होणार आहे. नाक्या-नाक्यावरती विपुल कदम यांचे बॅनर गुहागरमध्ये राजकीय चर्चेचा विषय झाला आहे. हा सगळा माहौल पाहता गुहागर विधानसभा मतदारसंघातील विपुल कदम यांची राजकीय एन्ट्री निश्चित मानली जात आहे.
विधानसभेला विपुल कदम Vs भास्कर जाधवांचा सामना
ठाकरे गटाचे भास्कर जाधव हे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे शिंदे गटाने विपुल कदम यांना रिंगणात उतरवल्यास विधानसभा निवडणुकीत त्यांना भास्कर जाधव यांच्याशी दोन हात करावे लागतील. विपुल कदम यांच्या पाठीशी श्रीकांत शिंदे यांची संपूर्ण ताकद उभी राहणार असली तरी भास्कर जाधव यांच्यासारख्या आक्रमक नेत्याचा सामना करताना विपुल कदम यांचा कस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विपुल कदम हे भास्कर जाधव यांचा सामना कसा करणार, हे पाहणे आगामी काळात औत्स्युकाचे ठरेल. मात्र, या मतदारसंघातून भाजपचे विनय नातू आणि निलेश राणे हे दोघेही इच्छूक आहेत. त्यामुळे आता गुहागरची जागा आपल्या मेहुण्यासाठी पदरात पाडून घेताना श्रीकांत शिंदे भाजपची समजूत कशाप्रकारे काढणार, हे पाहावे लागेल.
आणखी वाचा