Shivsena UBT : टायगर जिंदा है, वज्रमूठ मजूबत, 100 टक्के आम्ही कुठंच जाणार नाही, अरविंद सावंतांचा 7 खासदारांच्या साक्षीनं शब्द
Shivsena UBT : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व खासदारांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. अरविंद सावंत यांनी ठाकरेंची साथ सोडणार नाही असं म्हटलं.

Shivsena UBT MP Press नवी दिल्ली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल् या होत्या. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी सर्व खासदारांसह राजधानी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. अरविंद सावंत म्हणाले, ज्यांचं सरकारमध्ये त्रांगडं सुरु आहे, वाद सुरु आहेत, गंभीर वाद सुरु आहेत. या सगळ्याकडून दृष्टी दुसरीकडे वळवावी असा प्रयत्न केला जातो. त्यानुसार जाणीवपूर्वक सकाळी 7 वाजल्यापासून बातम्या कोणीतरी सोडण्यात आल्या आहेत, असं अरविंद सावंत म्हणाले.
आपण सर्व जाणता सकाळपासून अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेय, एकमत नाही, सुसंवाद नाही, विंसवाद सुरु आहे. अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत. या सगळ्या बातम्या सातत्यानं दिसत असताना ते डायवर्ट करायचं यासाठी कुणीतरी पुडी सोडली आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.
काल लोकसभेच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कार्यायलय मिळालं त्याचं उद्घाटन झालं, त्यावेळी सर्व खासदार उपस्थित होते. टप्प्या टप्प्यानं त्यांच्यातील माणसं तिकडं जाणार होती. त्यांच्यातील माणूस आमदारांना घेऊन जाणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं होतं.
आमच्या खासदारांबद्दल, निष्ठेबद्दल जनतेची मनं कलुषित करण्याचा प्रयत्न होतोय, याचा निषेध करतोय. एका निष्ठेनं ही माणसं राहिलेली आहेत. काही चढ उतार होऊद्यात आम्ही सारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहोत.त्यामुळं जे कोण बातम्या सोडतंय त्यांनी हे चित्र पाहावं, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं. खासदार संजय दिना पाटील थोड्याच वेळात येतील, असं अरविंद सावंत म्हणाले.
ठाकरेंच्या खासदारांनी कुणाचा फोन आलेला नाही, असं सांगितलं. 100 टक्के आम्ही कुठंच जाणार नाही. बांगलादेशमध्ये हिंदूवर अन्याय झाला, मणिपूरमध्ये जे घडलं त्याच्यावर नरेंद्र मोदी आवाज काढत नाहीत. अमृतसरमध्ये अमेरिकेचं विमान उतरणं देशाचा अपमान आहे. निवडणुकीशिवाय त्यांचं हिंदुत्व काही नाही. नोकरशाही त्यांच्या दावणीला बांधलेली आहे. देशाचा अपमान अमेरिकेनं केलेला आहे. छोट्या छोट्या देशांनी विमान पाठवायचं नाही हे सांगितलं. आपल्या देशानं तसं का केलं नाही. दोघांनी मिळून ट्रम्पचा प्रचार केला त्यावेळी ट्रम्पचा पराभव झाला होता.
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेलं नाही. आमचं हिंदुत्व सर्वसमावेशक आहे. ते राष्ट्राच्या मातीशी निगडीत आहे. जो या राष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण करायला तयार आहे तो आमचा आहे हे आम्ही समजतो, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं. बीड मध्ये जे प्रकरण सुरु आहे त्या बातम्या थांबतात, असं अरविंद सावंत म्हणाले.
जे महाराष्ट्रात घडतंय ते पाहावं. त्यांच्या पक्षात जी हलचल सुरु आहे ती पाहावी. कुणाचं महत्त्व कमी होतंय ते पाहा. आमचे लोकसभेतील 9 आणि राज्यसभेचे 2 खासदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, असं अनिल देसाई म्हणाले.
दरम्यान, संजय दिना पाटील पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते, ते संजय राऊत यांच्यासोबत असल्यानं इकडे उपस्थित नसल्यासं सांगण्यात आलं.
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

