संजय गायकवाड तीन दिवसांपूर्वीच म्हणाले मी मीडियाला बोलणार नाही; आता थेट 'तू अन् मी' एकटा मैदानात येण्याचं चॅलेंज
एमआयएम नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील हे काल रविवार रोजी बुलढाणा दौऱ्यावर होते. बुलढाण्यासह त्यांनी मोताळा, मलकापूर व नांदुरा येथे कॉर्नर सभा घेतल्या.

बुलढाणा : मुंबईतील आमदार (MLA) निवासातील कँटीन चालकास मारहाण केल्याने राज्यभरात चर्चेत आलेले आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असलेल्या आमदार संजय गायकवाड (Sanjay gaikwad) यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी चक्क हॉटेलमध्ये वेटर आणि कुकला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता त्यांनी चक्क माजी खासदारास चॅलेंज दिले आहे. मुंबईतील आझाद मैदानात तू आणि मी एकटा येतो. आपल्या दोघांच्या मध्ये तिसरा कोणीच येणार नाही, असं चॅलेंजच आमदार संजय गायकवाड यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (Imtiaz jalil) यांना दिले आहे. आता, गायकवाड यांच्या चॅलेंजवर इम्तियाज जलील काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी आपण मीडियाला बोलणार नाही असे गायकवाड यांनी म्हटलं होतं. मात्र, त्यांनी त्यांचा शब्द फिरवल्याचं दिसून आलं.
एमआयएम नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील हे काल रविवार रोजी बुलढाणा दौऱ्यावर होते. बुलढाण्यासह त्यांनी मोताळा, मलकापूर व नांदुरा येथे कॉर्नर सभा घेतल्या. त्यावेळी, माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मी कुणाच्याही आव्हानाला म्हणून बुलढाण्यात आलेलो नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांना भेटायला आलेलो आहे. मात्र, आमदार संजय गायकवाड यांनी आज पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांना आव्हान दिलं आहे. पोलिसांनी मला विनंती केली म्हणून याला बुलढाण्यात पाय ठेवता आला. मला जर त्याच्या बाबतीत द्वेष असता तर मी त्याला मराठवाड्याची बॉर्डर क्रॉस करू दिली नसती, असे आमदार गायकवाड यांनी म्हटलं.
इम्तियाज जलील यांनी मला व्यक्तिगत आव्हान दिलेलं असल्याने मला यात हिंदू किंवा मुस्लिम धर्माला गोवायचं नाही. पण, त्याला जर एवढी खाजच असेल तर त्याने पोलीस महासंचालकांना एक एफिडेविट करून द्याव की, आमच्या दोघांच्या वादामध्ये आमच्या दोघांचं काही बरं वाईट झालं तर आम्ही दोघेच जबाबदार राहू. मग मी तुला मुंबईतील आझाद मैदानावर बोलवतो, त्या ठिकाणीच कुणात किती दम आहे हे पोलिसांसमक्ष आपण बघू. आपल्या दोघांच्या मध्ये तिसरा कोणीच येणार नाही, असं चॅलेंजच आमदार संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांना दिले आहे. दरम्यान, विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांशी कधीच न बोलण्याची भूमिका जाहीर केली होती.
हेही वाचा
मोठी बातमी! उड्डाणानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं; कॉलेज कॅम्पसमध्ये गोंंधळ, जाळ अन् धुराचे लोट
























