हिवाळी अधिवेशन संपताच शरद पवार मस्साजोगच्या मैदानात; प्रकरणाची पायमुळं कुठपर्यंत याचा आढावा घेणार : बजरंग सोनावणे
Beed : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात गाजत असलेल्या बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला गती यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद हे आता बीडला जाणार आहेत.
Santosh Deshmukh Beed Death बीड : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात गाजत असलेल्या बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला गती यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद हे आता बीडला जाणार आहेत. संसदेचे हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबरला संपत आहे. हे अधिवेशन संपताच दुसऱ्याच दिवशी शरद पवार हे बीडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. शरद पवार हे येत्या 21 तारखेला सकाळी मस्साजोग गावाला येणार आहेत. 20 तारखेला ते संभाजीनगरला मुक्काम करणार आहेत. यावेळी ते देशमुख कुटुंबाची भेट घेत सांत्वन करणार आहेत. तसेच या प्रकरणाची पायमुळं कुठपर्यंत आहेत, याचा शरद पवार आढावा घेणार असल्याची माहिती बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी दिली आहे.
बीडमधे आम्ही गुण्यागोविंदाने राहत आहोत, मात्र....
बीड जिल्ह्यात बऱ्याच घटना घडल्या आहेत. त्यांच्या खोलात जाऊन गुन्हेगार जे कोणी असतील यांच्यावर कारवाई करावी, यासाठी शरद पवार स्वतः तिथे जात आहेत. घडलेली ही घटना खूप वाईट आहे. आरोपींना शिक्षा झाली पाहिजे यासाठी शरद पवार बीडमधे येत आहेत. बीडमधे आम्ही गुण्यागोविंदाने राहत आहोत, यात राजकीय हेतू आजिबात नाही. संतोष देशमुख खून प्रकरणी 7 आरोपी दाखवले आहेत, त्यातले 2 आरोपी पहिल्या दिवशी अटक केली होती. मात्र त्याच्याकडून काय काय सामान जप्त केलं ते पोलिसांनी सांगितल नाही. अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षाला आज अटक झाल्याचं समजतंय. आतापर्यंत 4 आरोपींना अटक झाली आहे, आणखी 3 आरोपी फरार आहेत, त्यांना अटक झाली पाहिजे. तसेच CBI मार्फत चौकशी व्हावी, ही माझी मागणी आहे. पंकज कुमावत सारख्या अधिकार्याकडे तपास दिला पाहिजे, ही माझी मागणी असल्याचेही खासदार बजरंग सोनावणे म्हणाले.
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण काय?
केज (Kej) तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुखांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून खून करण्यात आला. संतोष देशमुख व त्यांचा आतेभाऊ हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगावजवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली आणि त्यांचे अपहरण करण्यात आलं.
याबाबत केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या धनंजय देशमुखांना तीन तास ताटकळत ठेवण्यात आलं. पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. मात्र काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात संतोष देशमुखांना जबर मारहाण केल्याचं त्यांच्या शरिरावरील घावांवरून दिसून आलं.
या घटनेनंतर राज्यभर खळबळ उडाली असून त्यावरून आता राजकारणही तापलं आहे. ही हत्या पवनचक्की खंडणी प्रकरणातून झाल्याची चर्चा आहे. या पवनचक्की खंडणी प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा