Sharad Pawar NCP Second List : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज दुसरी यादी जाहीर होणार; माढा, बीड, साताऱ्यातून कोणाला संधी?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सध्या राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजूनही सत्ताधारी महायुती (Mahayuti) आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) यांच्यातील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. राज्यातील सर्वच पक्षांनी आपल्या काही जागांवर उमेदवार जाहीर केले असले तरी काही जागांवर एकापेक्षा अधिक नेते निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे काही जागांचा वाद सोडवताना पक्षाच्या नेतृत्त्वाची दमछाक होत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतर्फे सातारा, माढा, बीड (Satara, Madha, Beed) या महत्त्वाच्या जागांवर कोणाला संधी दिली जाणार असे विचारले जात आहे. याच पार्श्वभूमीवर या जागांसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून (NCP) आज (4 एप्रिल) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली जाऊ शकते.
सातारा, बीड, माढ्याचे उमेदवार जाहीर होणार?
शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आज आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. मविआमध्ये बीड, रावेर, सातारा, माढा, भिवंडी या जागांवर अद्याप उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. यातील बीड, सातारा, माढा लोकसभेसाठी शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आपले उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
बीड, माढ्यातून कोणाला संधी?
बीडमध्ये महायुतीकडून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलेले आहे. त्या सध्या जोमात प्रचार करत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे आणि शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांच्या नावाचा विचार केला जात आहे. त्यामुळे या दोन नावांपैकी शरद पवार कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माढ्यासाठी पवारांकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचा विचार केला जात होता. मात्र आता ते परभणीतून महायुतीच्या तिकिटावर लढत आहेत. त्यामुळे या जागेवर आता कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या जागेसाठी मोहिते पाटलांच्या नावाचा विचार केला जात आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशअध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनीदेखील पवार यांची भेट घेऊन मी ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे.
साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी प्रयत्न
साताऱ्याची जागा ही पवारांसाठी विशेष महत्त्वाची आहे. या जागेवरून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील निवडणूक लढवणार होते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी माघार घेतली. त्यानंतर आता येथून कोणाला संधी द्यावी, असा पेच पवारांसमोर उभा ठाकला आहे. येथून काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र ते काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे या जागेवरही शरद पवार काय निर्णय घेणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.