संकटात मी एकटी नवाब मलिकांसोबत, सोयीप्रमाणे नातं जोडायचे भाजपचे संस्कार; सुप्रिया सुळेंचा भाजपवर घणाघात
नवाब मलिकांना भाजप अंतर देत होती तेव्हा सुप्रिया सुळे एकटी त्यांच्या बाजूने होती. सोयीप्रमाणे नाते जोडायचे आणि नंतर तोडायचे संस्कार भाजपचे असतील, पण आमचे नाही. अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
Supriya Sule धुळे : भाजपने (BJP) कधीकाळी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर टोकाचे आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तर अजित पवारांना (Ajit Pawar) पत्र लिहिले होतं, की आमच्या आघाडीमध्ये नवाब मलिक चालणार नाहीत. जेव्हा फडणवीस नवाब मलिकांना अंतर देत होते तेव्हा सुप्रिया सुळे(Supriya Sule) एकटी त्यांच्या बाजूने बोलली होती. नवाब मलिक आणि आम्ही 18 वर्षे सोबत काम केले आहे. सोयीप्रमाणे नाते जोडायचे आणि सोयीप्रमाणे नाते तोडायचे, हे भारतीय जनता पक्षाचे संस्कार असतील, पण आमचे नाही. एकदा नातं जोडलं की ते आयुष्यभर टिकवण्याची नैतिक जबाबदारी ही एका बहिणीची आहे. अशी बोचरी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या असताना त्यांच्या उपस्थितीत शिंदखेडा येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिक यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधलाय.
भाजपने सर्वत्र गलिच्छ राजकरण केलं - सुप्रिया सुळे
भाजप हा पक्ष पूर्वी सुसंस्कृत होता. आता नवीन भाजपने महाराष्ट्र आणि देशात गलिच्छ राजकरण केलं आहे. महाराष्ट्र संविधानाने चालतो, कोणाच्याही मनमानीने चालत नाही. सत्ता, पैसा, पद या गोष्टी येतात आणि जातात. शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव द्यावा, आशा स्वयंसेवक महिलांना पाच हजार देतो म्हणाले होते, अद्याप त्यांना पैसे दिले नाहीत. येत्या पाच दिवसात जर आशा वर्कर महिलांना पाच हजार रुपये मिळाले नाहीत, तर मी आंदोलन करणार असल्याचे ही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्यातलं सरकार हे स्वार्थी सरकार- सुप्रिया सुळे
हे सरकार खोक्यांचे आहे. 50 खोके घेऊन हे सरकार तयार झाले आहे. ते पैशाने विकले गेले असतील. पण महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी असल्याचे सुळे म्हणाल्या. मी माझं काम पारदर्शकपणे लोकांसमोर ठेवलं. आपल्याकडे ईडी सीबीआय असली भानगड नाही. या सरकारनं लाडकी बहिण योजनेच्या जाहीरतीसाठी 200 कोटी रुपये खर्च केला आहे. राज्यातलं सरकार हे स्वार्थी सरकार आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन सुळे यांनी दिले. आपल्या राज्यात आलेला रोजगार दुसऱ्या राज्यात नेला जातो. आपल्या राज्यातील उद्योग व्यवसाय हे परराज्यात जात असल्याने राज्यात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या :