(Source: ECI/ABP News/ABP Majha)
निव्वळ पंधराशे रुपयात महिलांची मते विकत घेण्याचा सरकारचा कार्यक्रम; सुप्रिया सुळे यांचा सरकारवर घणाघात
Supriya Sule on Mahayuti : लाडकी बहिणी योजनेतून पंधराशे रुपयात महिलांचे मत विकत घेण्याचा कार्यक्रम या सरकारने सुरू केला असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केली आहे
Supriya Sule धुळे : महायुतीचे सरकार (Mahayuti) आल्यास लाडकी बहिणी योजनेतून (Ladki Bahin Yojana) तीन हजार रुपये देऊ. सोबतच यापुढेही या योजनेत सातत्य राहणार असून एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना म्हटले. तर, पुढील 5 वर्षांसाठी ही योजना निश्चित सुरू होईल, महिला भगिनींना 5 वर्षांचे 90 हजार रुपये मिळतील, असा शब्द अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातल्या बालेवाडीतील कार्यक्रमातून दिला.
या घोषणेनंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीने अशी घोषणा केल्याने ते आता म्हणालेत. मात्र ते फक्त सत्तेत परत येण्याची भाषा करीत आहेत. नेहमी मतांचीच भाषा ते करीत आहेत. लाडकी बहीण योजने शिवाय या सरकारकडे दुसरे तिसरे काहीही नाही. पंधराशे रुपयात महिलांचे मत विकत घेण्याचा कार्यक्रम या सरकारने सुरू केला असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केली आहे.
तर राज्य सरकार करतंय तरी काय?
लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे सावत्र भावांनी चुकीचे भरून घेतले असून यामुळे महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येत असल्याचे वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यानंतर यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्याचे गृहमंत्रीच असे म्हणत असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे. तुमचेच पोर्टल असून त्यावर अशी चुकीच्या पद्धतीने माहिती भरली गेल्यास त्यावर राज्य सरकार करताय तरी काय? असा प्रश्नच सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. तर यासंदर्भात आपण केंद्रालाच पत्र लिहून राज्याचे गृहमंत्री असं वक्तव्य करत असल्याबाबत कळवणार असल्याचंही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
भाजपचे लोकही पवार साहेबांचे कौतुक करतात- सुप्रिया सुळे
सिंदखेडराजाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांचे केलेल्या कौतुकाबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पवार साहेबांचे कौतुक भाजपचे लोकही करत असतात. सगळ्याच पक्षाची लोक पवार साहेबांबद्दल अत्यंत आदराने बोलतात, हे आमचे भाग्य आहे. राजकारणात राजकारण होत असतं. मात्र वैयक्तिक संबंध देखील असतात. शिंगणे कुटुंबाचे आणि आमचे अनेक दशकांचे संबंध आहेत. राजेंद्र शिंगणे हे अत्यंत संवेदनशील नेते आहेत. मंत्री अनिल पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचे अडीच लाखांचे उत्पन्न असल्यास महायुतीचे सरकार त्यांनाही पंधराशे रुपये दर महिन्याला देतील, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशात लोकशाही असून सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. असे म्हणत त्यांनी यावर फार बोलणं टाळले आहे.
ज्या सर्वेमध्ये मला पराभूत दाखवले, तिथं मी दीड लाखांच्या मतांनी विजयी
बँकांमध्ये होत असलेल्या महिलांच्या गर्दी बाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बँकांमध्ये होणारा गोंधळ हा प्रशासनाचे अपयश असून प्रशासनाने या गोष्टीचा विचार करायला हवा होता. हे सरकार मिस मॅनेजमेंटचे असून मला यांच्याकडून फारशा कुठल्याही अपेक्षा नाहीत. स्वतः च्या स्वार्थासाठी एकत्र झालेले हे सरकार असून त्यामुळे त्यांच्याकडून काय दुसऱ्यांच्या वेदना आणि प्रश्न सोडवण्याच्या अपेक्षा करणार. एका सर्व्हे मध्ये महाविकास आघाडीचा अत्यंत कमी जागा दाखवण्यात आले असून भाजपला 120 जागा दाखवण्यात आले आहेत. मात्र याच टाइम्सने केलेल्या सर्वे मध्ये मला पराभूत दाखवले होते त्या ठिकाणी मी दीड लाखांच्या मतांनी विजयी झाली.