Beed : कुठे गुगली तर कुठे फुल टॉस; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात दोन्ही पवारांच्या सभेत असं तापलं 'राजकारण'
Maharashtra Politics NCP : राष्ट्रवादी पक्षात सुरु असलेला वाद आता आणखीच टोकाला पोहचला असून, थेट सभांमधून एकेमकांना उत्तर दिले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
बीड: राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवारांच्या (Sharad Pawar) पाठोपाठ आता अजित पवारांची (Ajit Pawar) देखील सभा झाली. या दोन्ही सभेमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. काल झालेल्या अजित पवारांच्या सभेत तर शरद पवारांच्या विरोधात भाषणं होत असल्याने नागरीक उठून गेल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत राष्ट्रवादी पक्षात सुरु असलेला वाद आता आणखीच टोकाला पोहचला असून, थेट सभांमधून एकेमकांना उत्तर दिले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
बीडमध्ये 17 ऑगस्ट शरद पवारांची आणि अजित पवारांची 27 ऑगस्ट सभा झाली. दहा दिवसांच्या फरकाने झालेल्या या दोन्ही सभांसाठी पवार कुटुंबावर प्रेम करणारे हजारो लोक सभेसाठी जिल्हाभरातून दाखल होते. पहिल्या सभेत शरद पवारांनी आपल्या भाषणातून धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांच्यावर टीकेचे बाण सोडले होते. तर अजित पवारांनी आपल्या सभेतून शरद पवारांवर टीका करण्याचे टाळले असले तरीही धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांनी आपल्यावार झालेल्या टीकेची परतफेड केली.
परभणीतील कार्यक्रम संपल्यावर अजित पवार हे हेलिकॉप्टरने बीडला पोहोचणार होते. मात्र, पावसामुळे हेलिकॉप्टरचा प्रवास त्यांना टाळावा लागला. त्यामुळे, अजित पवार थेट मोटारीने बीडमध्ये दाखल झाले. दादा बीडमध्ये पोहोचताच कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. चौका चौकामध्ये अजित पवार यांचे स्वागत आणि त्यांच्यावर पुष्पष्टी करण्यात आली. त्यामुळे सभास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागला. विशेष म्हणजे व्यासपीठावर भाषण करताना अजित पवारांनी कोणावर टीका करण्यापेक्षा थेट बीडच्या विकासावरच बोलणं पसंत केलं.
पवारांच्या गुगलीवर भुजबळांचे फुल टॉस...
अजित पवार यांनी घेतलेली सभा उत्तरदायित्व सभा असल्याचा दावा करण्यात आला असला, तरीही या सभेत शरद पवारांवर छगन भुजबळ यांनी थेट टीका केली. आपल्या भाषणात बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवर थेट सवाल उपस्थित केले. आपल्याला मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडल्यापासून सुरु झालेले भुजबळांचे मुद्दे थेट पवारांच्या भूमिका आत्तापर्यंत कशा चुकीच्या ठरल्या इथपर्यंत पोहचले. त्यामुळे शरद पवारांनी टाकलेल्या गुगलीवर छगन भुजबळानेही थेट फुल टॉस टाकायला सुरुवात केली. पण, शेवटी खालून नागरिकांचा विरोध होण्यास सुरुवात झाल्यावर भुजबळ यांना आपले भाषण आटोपते घेण्याची वेळ आली.
अन् लोकं उठून चालली होती...
छगन भुजबळ यांनी केलेल्या आपल्या सगळ्या भाषणात त्यांनी शरद पवारांना काही प्रश्न विचारले. पवारांवर जोरदार टीका देखील केली. हे सगळं सुरू असताना लोकं खालून टाळ्या वाजवत होते. काहीजण चेअरअप करत होते. पण याचवेळी काही लोकं मात्र सभेतून उठून देखील जात असल्याचे चित्र पाहायला मिळालं. याच प्रसंगावरून जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी छगन भुजबळ यांना घेरण्याचा प्रयत्न केला. ट्विटरच्या माध्यमातून आव्हाड यांनी बहाद्दर बीडकरांचे आभार मानले, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या बद्दल बोललेलं बीडकर खपवून घेणार नाहीत असं ट्विट केलं.
आतापर्यंतचे रेकॉर्ड मोडणारी सभा असल्याचा दावा?
सभेत छगन भुजबळ यांचं भाषण सुरू असताना लोक उठून जात होते, हा दावा मात्र अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी खोडून काढला आहे. उलट शरद पवार यांच्या सभेलाच पैसे देऊन लोक आणल्याचे आरोप या कार्यकर्त्यांनी केले आहेत. तर दुसरीकडे बीडमधील अजित पवारांची सभा ही ऐतिहासिक आणि आतापर्यंतचे रेकॉर्ड मोडणारे होती. त्यामुळेच असे बिनबुडाचे आरोप करण्यात येत असल्याचा दावा अजित पवार गटाचे कार्यकर्ते करत आहेत.
शरद पवार गटाकडून उत्तर...
बीडच्या सभेतून धनंजय मुंडे यांनी थेट आपल्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केल्यानंतर शरद पवार गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. विधान परिषदेच्या आमदारापासून ते मंत्रीपदापर्यंत शरद पवारांनी धनंजय मुंडे यांना सर्व काही दिलं. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना अनेक संधी दिली आहे. मात्र, त्यांनी काल जे वक्तव्य केलं ते बालीस असल्याचं शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीत ज्या ज्या वेळी फेरबदल होतात, त्याचा थेट परिणाम बीड जिल्ह्यात होत असतो. म्हणूनच आधी थोरल्या पवारांनी आणि नंतर धाकट्या पवारांनी दहा दिवसाच्या फरकाने बीडमध्ये दोन सभा घेतल्या. त्यामुळे या दोन्ही सभेसाठी झालेली गर्दी, घोषणा देणारे कार्यकर्ते आणि टाळ्या वाजवणारे हात आगामी काळात नेमके कोणासोबत राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
NCP : अजित पवार गटाला पक्षासह चिन्हही मिळणार, प्रफुल्ल पटेल यांनी 'तारीख'ही सांगितली