चंद्रकांत पाटलांना म्हणाले, बसा, गप्पा मारु; मग उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांचा एकत्र लिफ्टने प्रवास, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Vidhan Sabha session: सत्ताधारी आणि विरोधक विधानसभेच्या दालनात हसतखेळत असल्याचं पाहायला मिळाले.
Uddhav Thackeray Devendra Fadnavis Marathi News मुंबई: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Vidhan Sabha session) आजपासून सुरुवात झाली आहे. 14 व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या अधिवेशनाला विशेष महत्त्व आहे. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांचं वेगळं चित्र पाहायला मिळालं. सत्ताधारी आणि विरोधक विधानसभेच्या दालनात हसतखेळत असल्याचं पाहायला मिळाले.
पहिले ठाकरे गटाचे नेते अंबादान दानवे यांच्या कार्यालयात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अनिल परब देखील उपस्थित होते. यावेळी थोडं थांबा..गप्पा मारा, असं उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील यांना बोलताना दिसले. यानंतर उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकत्र लिफ्टने प्रवास केला. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विधानसभेतील या घडामोडींवर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी यावर भाष्य केलं.
संजय शिरसाट काय म्हणाले?
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बोलणं झालं. तसेच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र लिफ्टमधून प्रवास केला. याचा अर्थ आमचे काही वैयक्तिक भांडणं नाहीत. उद्धव ठाकरेंना संजय राऊतांसारखे लोक चुकीचं मार्गदर्शन करताय, कदाचित त्यांना याचा प्रत्यय आला असावा. राजकीय भांडण वेगळं, परंतु वैयक्तिक संबंध नेहमी असतात आणि ते कायम राहावे ते कधी तुटू नयेत. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की तुमचे मनभेद नसावे. याचं उदाहरण आज आपल्याला पाहायला मिळालं. महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम नेत्यांनी करायला हवं, म्हणून मी या घटनेला गैर समजत नाही. अत्यंत चांगली भेट झाली, त्यामुळे आम्हाला समाधान आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.
नेमकं काय घडलं?
चंद्रकांत पाटील दालनात आल्यावर अंबादास दानवे यांनी त्यांच्यासमोर पेढ्याचा बॉक्स धरला. दादा लोकसभा निवडणुकीत आमचे 31 खासदार निवडून आले म्हणून आम्ही पेढे वाटत आहोत, असे अंबादास दानवे यांनी म्हटले. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या हातातील पेढ्याचा एक तुकडा शेजारी उभे असलेल्या अनिल परब यांना देत म्हटले की, मी यांचा पेढा अॅडव्हान्समध्ये वाटतो. ठाकरे गटाचे अनिल परब हे नुकतेच मतदान पार पडलेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे किरण शेलार रिंगणात आहेत. या निवडणुकीचा निकाल 1 जुलैला जाहीर होईल. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचे अगोदरच अभिनंदन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.