Sanjay Raut : मविआत नेमकं काय चाललंय? संजय राऊत म्हणाले, आमचे उमेदवार कामाला लागलेत, केवळ एका जागेवरून संघर्ष
Sanjay Raut On Maha Viksa aghadi Seat Sharing : यादी जाहीर करण्याची परंपरा शिवसेनेची नाही, महाविकास आघाडीमध्ये असल्याने उद्या उमेवादारांनी नावं समोर येतील असं संजय राऊत यांनी सांगितलं.
मुंबई: महायुतीमध्ये असलेल्या गुलामांच्या तोडांवर जागांचे तुकडे फेकले जात आहेत, त्यांना जागा मागण्याचा अधिकार नाही, आमचं जागावाटप हे महाराष्ट्रात होतं, दिल्लीत जाऊन नेत्यांच्या लॉनवर रुमाल टाकावं लागत नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली. आमचे उमेदवार ठरले असून ते कामालाही लागले आहेत, महाविकास आघाडीमध्ये असल्याने उद्या जागावाटप जाहीर करू असंही ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, "शिवसेनेत यादी जाहीर करण्याची परंपरा नाही. संभाव्य उमेदवारांना काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मविआत असल्यामुळे उद्या यादी जाहीर करू. उद्धवसाहेबांनी सर्व उमेदवार निश्चित केलेत.काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही तयारी झाली आहे. केवळ एकाही जागेवरून संघर्ष आहे, पण तणाव नाही."
वंचित महाविकास आघाडीचा प्रमुख घटक
बहुजन वंचित आघाडी हा मविआतील महत्वाचा घटक पक्ष आह असल्याचं सांगत संजय राऊत म्हणाले की, आंबेडकर आमचे नेते आहेत. त्यांच्याशी वारंवार संपर्क साधतोय, संवाद कायम ठेवलेला आहे. मागेपुढे थोडे होते. त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला, त्यात अकोलाही आहे. पण तो त्यांना मान्य नाही. आम्ही पुन्हा त्यांच्याशी चर्चा करू. वंचित आमच्यासोबत असायला हवी. आंबेडकरांशी निरंतर बोलणे सुरू आहे. त्यांच्याशी बोलले की प्रेरणा, ऊर्जा मिळते.
सांगलीची जागा शिवसेनेची
संजय राऊत म्हणाले की, हातकणंगलेची जागा शिवसेनेची आहे. जयंत पाटील हातकणगंले, साताराचा आढावा घेत आहेत. यावर आम्ही चर्चा करू. तर सांगलीची जागा शिवसेना लढणार. भिवंडीवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. आमचा कुठलाही प्लॅन ए, बी नाही. हुकुमशाही संपवणे हाच आमचा प्लॅन आहे.
गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात
महायुतीच्या जागावाटपाच्या सुरू असलेल्या चर्चांवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात. ते मांडलिक आश्रित असतात, त्यांना मागण्याचा हक्क नसतो. त्यांच्या तोंडावर कायम तुकडे फेकले जातात. आमचे जागावाटप महाराष्ट्रतच होते. आम्हाला दिल्लीला जावून नेत्यांच्या लॉनवर रूमाल टाकून बसावे लागत नाही.
गळाला लावतात आणि गाळात घालतात
गळालाच लावतात ते आणि गाळात घालतात. महायुतीसोबत जाण्याचा निर्णय हा जानकरांचा आहे. बारामतीत सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने जिंकून येतील. मीही सभा घेतलीय, वेळ पडली तर उद्धव ठाकरे जाहीर सभा घेतील. सुप्रियाताई जिंकून येणार असल्यानं तिथे कुणीही लढायला तयार नाही, मग ते कुणालाही गळाला लावू द्या असं संजय राऊत म्हणाले.
ही बातमी वाचा: